मुंबई : 'एबीपी माझा'च्या ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आलेल्या पोलिसांना आता सिनेमात गाण्याची संधी मिळणार आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील पोलीस ठाण्यात शिपाई असलेले योगेश गायके सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत. त्यांचे मित्र किशोर दिवटे यांच्यासोबत पावसाला आपल्या गाण्यातून साद घालणारा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


योगेश गायके आणि किशोर दिवटे यांच्या या व्हिडिओवर लाईक्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. ही बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर अमेय खोपकर आणि अवधूत गुप्ते यांनी या दोघांशी संपर्क साधला. त्यामुळे पोलिस शिपाई योगेश गायके आणि त्यांचे मित्र किशोर दिवटे यांना सिनेमात गाण्याची संधी गायक, संगीतकार अवधूत गुप्ते देणार आहेत.



'एबीपी माझा'ने त्यांच्या गायनाची झलक अवघ्या महाराष्ट्राला दाखवली. एबीपी माझाने दिलेल्या व्यासपीठाची दखल गायक, संगीतकार अवधूत गुप्ते आणि अमेय खोपकर यांनी घेतली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या गायकीला न्याय मिळाला आहे. अवधूत गुप्ते आणि अमेय कोपकर यांनी घेतलेली दखल आपल्यासाठी जीवनातील अविस्मरणीय क्षण असल्याची प्रतिक्रिया या दोघांनी दिली. त्यात त्यांनी एबीपी माझाचे मनापासून आभार मानले आहेत.