मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज पार पडली. विधानसभेला राष्ट्रवादी 2009 पेक्षा जास्त जागांवर लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे काँग्रेसपेक्षा जास्त खासदार निवडून आल्यानं राष्ट्रवादी जास्त जागांसाठी आग्रही आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत अजित पवार यांनी विलीनीकणाला विरोध केल्याची माहिती समोर येत आहे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर पक्षात विलीन होणार नाही. पक्षाचे स्वतःचे एक अस्तित्व आहे, हे अस्तित्व पक्ष कायम ठेवणार. कार्यकर्त्यांनी अफवांना बळी पडता कामा नये, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.


विधानसभेत महिलांना आणि तरुणांना संधी देणार


लोकसभेत दक्षिण नगरची जागा काँग्रेसला म्हणजेच सुजय विखेंना न सोडून घोडचूक केल्याची उपरती राष्ट्रवादीला झाल्याचं समजत आहे. कारण पक्षाचे पारंपरिक मतदारसंघ न बघता, ज्याची जिंकण्याची क्षमता त्याला मतदारसंघ सोडण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं आजच्या चिंतन बैठकीनंतर घेतला आहे.


लोकसभेत राष्ट्रवादीनं दक्षिण अहमदनगरची जागा काँग्रेससाठी म्हणजेच सुजय विखेंसाठी सोडण्यास नकार दिला होता. मात्र तो हट्ट राष्ट्रवादीलाच महागात पडला, कारण दक्षिण अहमदनगरमधून राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचा दारूण पराभव झाला होता. दरम्यान विधानसभा निवडणुकीत नवीन आणि तरूण उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला आहे.


विधानसभा निवडणुकीला 100 दिवसाचा कालावधी उरला आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन निवडणूक लढायची भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. त्यामुळे लवकरात लवकर जागा वाटप होऊन सर्वांनी अधिक जोमाने काम करावे, नेत्यांना विभागावर जबाबदारी देणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितलं. उमेदवार चाचपणी करून लवकरात लवकर तयारी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.