Yashwant Jadhav : मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी 72 तास आयटीची (Income Tax) चौकशी झाली. आयकर विभागाच्या कारवाईनंतर माध्यमांशी बोलण्यास यशवंत जाधवांनी नकार दिला आहे. या कारवाईत अनेक कागदपत्रांवर यशवंत जाधव यांच्याकडून जबरदस्ती स्वाक्षरी घेतल्याची माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी दिली आहे. यशवंत जाधव यांच्या घरी सुरू असलेली आयकर विभागाची चौकशी अखेर चौथ्या दिवशी 72 तासांनी संपली. आयकर विभागाने फक्त यशवंत जाधव यांच्या घरीच नाही तर त्यांचे निकटवर्तीय त्यांच्या संपर्कात असलेले कंत्राटदार व त्यांच्या संपत्तीवर सुद्धा मागील तीन दिवसात छापेमारी केली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कागदपत्र डिजिटल डॉक्युमेंट्स आयटी विभागाने जप्त केले असून याचा संपूर्ण अहवाल आयकर विभागाकडून तयार केला जात आहे. 


IT कारवाईनंतर माध्यमांशी बोलण्यास जाधवांचा नकार, अनेक कागदपत्रांवर जबरदस्तीनं घेतली स्वाक्षरी? 


चौकसी दरम्यान यामिनी जाधव या एका आजाराने ग्रस्त असून  कारवाई दरम्यान यांची प्रकृती खालावली. आयटी अधिकाऱ्यांना जाधव कुटुंबियांनी सहकार्य केले.मात्र अनेक प्रश्नांची उत्तरं ही आयटी अधिकाऱ्यांनी आधीच अपेक्षित धरून लिहिल्याची  माहिती जाधवांच्या जवळच्या व्यक्तींनी दिली आहे. महापालिकेचा अर्थ संकल्प सभागृहात सादर करायचा असून जाधव हे आजपासून पालिकेच्या कामात सक्रिय झाले आहे. शुक्रवारी सकाळी 7 वाजता मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली. फक्त यशवंत जाधव यांच्या घरीच नाही तर त्यांचे निकटवर्तीय, त्यांच्या संपत्तीसोबतच त्यांच्याशी संबंधित कंत्राटदारांवर सुद्धा आयकर विभागाने छापे टाकले. मागील तीन दिवसात 30 पेक्षा अधिक ठिकाणी ही छापेमारी केली असल्याची माहिती आहे. आणि अखेर आज सकाळी दहा वाजता 72 तास चौकशी केल्यानंतर आयकर विभागाचे दहा ते बारा अधिकारी ही चौकशी संपूर्ण यशवंत जाधव यांच्या घरातून बाहेर निघाले.


 


15 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
यशवंत जाधव यांनी आपल्याकडे असलेली रोख रक्कम प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड या शेल कंपनीत वळवली असल्याचा आरोप आहे. जे या कंपनीचे संचालक होते त्यांच्या ऐवजी यशवंत जाधव यांचे कुटुंबीय त्या कंपनीचे संचालक झाले. साधारणपणे 15 कोटी चा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप या प्रकरणांमध्ये केला जातोय. या प्रकरणी यशवंत जाधव यांच्या घरावर, त्यांच्या संपत्तीवर शिवाय त्यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या गैरव्यवहारात संदर्भातील कंत्राटदार यांच्याकडे जाऊन सुद्धा आयकर विभागाची टीम सखोल चौकशी केली. शिवाय आमदार यामिनी जाधव यांनी प्रतिज्ञापत्रात संपत्ती संदर्भात माहिती दिली आहे. त्यामध्ये संपत्ती लपवण्याचा आरोप असून त्याची सुद्धा चौकशी आयकर विभाग करत आहे.


अनेक कागदपत्रांवर यशवंत जाधवांची जबरदस्तीने स्वाक्षरी?


आयकर विभागाकडून चौकशी करत असताना मोठ्या प्रमाणावर पोतभर कागदपत्र , डिजिटल डॉक्युमेंट्स ,हार्डडिस्क लॅपटॉप , स्कॅनर या सगळ्या गोष्टी विविध ठिकाणाहून आयकर विभागाने जप्त केले आहेत. शिवाय या व्यवहाराच्या संबंधित डॉक्युमेंट्स, स्टेटमेंट याची सुद्धा सखोल चौकशी जाधव कुटुंबिय व त्यांच्या निकटवर्तीयांकडून करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान नेमकं आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाधव कुटूंबियांची कशा प्रकारे माहिती घेतली गेली? याबाबत जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावर यशवंत जाधव यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. मात्र 72 तास चाललेल्या चौकशीमध्ये अनेक कागदपत्रांवर यशवंत जाधव यांची जबरदस्तीने स्वाक्षरी घेण्यात आली, अशी माहिती जाधव कुटुंबीयांच्या जवळच्या व्यक्तीने दिल्याचे समजते. तसेच जाधव कुटुंबिय या चौकशीदरम्यान पूर्णपणे सहकार्य करत असताना विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं अधिकाऱ्यांनी आधीच अपेक्षित धरूनच स्टेटमेंटमध्ये लिहिली असल्याचा या जवळच्या व्यक्तीने सांगितलं


पुढील चौकशीची दिशा ठरणार
चार दिवस चाललेल्या या आयकर विभागाच्या छापेमारी नंतर सर्व कागदपत्र गोळा करून त्याचा अहवाल आयकर विभागाकडून सादर केला जाईल. यामध्ये आर्थिक गैरव्यवहार संदर्भात ज्याप्रकारे आरोप केले गेलेत. त्यासंदर्भात पुरावे आढळले असतील तर या प्रकरणात पुढील चौकशीची दिशा ठरेल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांशी आयकर विभागाची होणारी चौकशी शिवसेनेला अडचणीत टाकणार का?  हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, ज्याप्रकारे सलग चार दिवस आयकर विभागाची छापेमारीमध्ये केलेल्या आरोपा संदर्भात जर पुरावे आयकर विभागाच्या हाती लागली असतील तर मग मात्र आयकर विभागाच्या सादर केल्या जाणाऱ्या अहवालानंतर यासंदर्भात कारवाईची पुढची दिशा ठरेल.