Sambhajiraje Chhatrapati Wife Sanyogitaraje :  मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आज तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली आहे. या आंदोलनात सुरुवातीपासून संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे त्यांच्या सोबत आहेत. त्या भावूक झाल्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. आज देखील संयोजिताराजे त्यांच्या सोबत होत्या. यावेळी त्यांनी समन्वयकांना सौम्य शब्दात खडसावलं. संयोजिताराजे शिष्टमंडळाला विनंती करत म्हणाल्या की, तोडगा काढूनच या. तसंच राजेंना कोणीही मानसिक त्रास देऊ नका, अशीही विनंती त्यांनी केली. हायपोप्लासियात गेल्यावर त्यांना मानसिक त्रास देणं चांगलं नाही, असं त्या म्हणाल्या. 

Continues below advertisement


तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली 


तिसऱ्या दिवशी संभाजीराजे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांचा ब्लड प्रेशर, शुगर कमी झाली आहे, मात्र त्यांनी औषधं घ्यायला नकार दिला आहे. संभाजीराजे यांच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर डॉक्टर म्हणाले की, 60 तास झालेत त्यांना आमरण उपोषण करत आहेत. त्यांचं शुगर आणि रक्तदाब कमी झालं आहे. सोबतच हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत. आम्ही शुगर लेव्हल वाढवण्यासाठी त्यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ते उपोषणावर असल्यानं त्यांनी यासंदर्भात नकार दिला आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. 


रक्तदाब आणि शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सोबतच संभाजीराजेंना कालपासून तीव्र डोकेदुखीचा त्रास जाणवत आहे. कोणत्याही प्रकारचे औषधे घेण्यास संभाजीराजेंकडून नकार देण्यात आला आहे. डाॅक्टरांकडून कालच सलाइन लावण्याचा सल्ला देण्यात आला होता मात्र संभाजीराजेंकडून सलाइन लावून घेण्यास नकार देण्यात आला आहे. 



संभाजीराजे यांना सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण


सरकारकडून चर्चेसाठी निमंत्रण आलं असल्याचं त्यांनी सकाळी सांगितलं होतं. आंदोलन कुठवर न्यायचं हे सरकारनं ठरवावं, असंही खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं. संभाजीराजेंनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, सकाळी अचानकच शुगर आणि रक्तदाब कमी झालं आहे. आमरण उपोषण करायची माझी इच्छा नाही.  महाराजांनी ज्याप्रकारे अन्यायाविरोधात लढा दिला त्याप्रकारे मी सुद्धा प्रयत्न करतोय, असं ते म्हणाले.


22 मागण्यांपैकी 6 मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात


खासदार संभाजीराजे म्हणाले की, गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिलीय. महाराजांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.  आरक्षणाचा दीर्घकालीन लढा आहे.  त्यामुळे ज्या 22 मागण्यांपैकी 6 मागण्या कमीत कमी मार्गी लागाव्यात. या मागण्यांना कोर्टाचे निर्बंध आहेत असं काही नाही, असं ते म्हणाले.  याआधी देखील असे निर्णय झाले आहेत. माझ्या बोलण्यात काही वेगळं नाही आहे. मला त्रास होतोय, सरकारनं ठरवावं आता कुठपर्यंत न्यायचंय. सरकारकडून बोलवणं आलंय, असं ते म्हणाले.