मुंबई :  याकूब मेमनच्या कबरीवर (Yakub Memon Grave)  करण्यात आलेली सजावट आणि एलईडी दिव्यांच्या रोषणाईवरून राज्यात मोठा वादंग झाला. पण बडा कब्रस्तानमधल्या याकूबच्या कबरीला वीजपुरवठ्याचं व्यावसायिक मीटर कोणी पुरवलं असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण कब्रस्तानातील वीजबिलं माझाच्या हाती लागली आहे. बडा कब्रस्तानचे ट्रस्टी शोएब खतीब आणि याकूब मेमनचा नातेवाईक रौफ मेमन यांच्या कृपेने हे सारं घडलं असा दावा स्थानिक रहिवासी शाहिद शेख यांनी केला आहे.


याकूबच्या कबरीसाठी स्पेशल वीज कनेक्शन देण्यात आलं होतं, असा दावा बडा कब्रस्तानचे माजी विश्वस्त जजील नवरंगी यांनी केला आहे. हा दावा स्थानिक रहिवाशांनी देखील केला आहे.  एवढच नाही तर बडा कब्रस्तानमधील एच ब्लॉक येथील याकूब मेमन कबरीच्या ओट्याला सप्टेंबर 2022 मध्ये 536 रुपयांचे इलेक्ट्रिक बिल आले होते. तसेच शेवटचे बिल 500 रुपये भरले गेले होते. पहिल्या बिलावर अब्दुल रौफ ओबेरॉय यांचे नाव आहे तर दुसऱ्या बिलावर इम्रान ओबेरॉय यांचे नाव आहे. दोन्ही बिलांवरचा पत्ता हा बडा कब्रस्तानचा असून जिथे याकूबची कबर आहे. आता हे ओबेरॉय कोण याचा मात्र शोध सुरू आहे


नवरंगे म्हणाले, वीज विभागाने दिलेल्या माहितीनुसार 28 जुलै 2021 रोजी दोन मीटर प्रदान करण्यात आले होते. एक एच ब्लॉक येथील याकूब मेमन कबर ओट्याला आणि दुसरे बडा कब्रस्तान येथील दुकानासाठी जे शौचालय तोडून बनवले गेले आहे. तसेच ओट्याला दिलेले इलेक्ट्रिक मीटर कधीच पाहिलेले नाही.  या वीजबिलांच्या आधारे  प्रकरणाची अधिक माहिती मिळविण्यासाठी नवरंगे यांनी आरटीआयसाठी अर्जही केला आहे. त्यातून आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. 


याकूब मेमनच्या कबरीचा ओटा खरंच विकण्यात आला होता का? याकूबच्या कबरीसाठी वेगळं मीटर कसं मिळालं? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याकूबची कबर सुशोभीत करण्यामागे नेमका कोणता प्लॅन होता? या प्रश्नाची उत्तरं शोधणं हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे.


 40 वर्षांपासून बडा कब्रस्तानमध्ये राहणारे शाहिद शेख म्हणाले की, कबर विक्रीचा घोटाळा उघडण्यासाठी पोलीस आणि महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे आणि चौकशी करावी. शोएब खतीबला अटक झाल्यावर याकुब मेमनची कबर विकण्यामागील सर्व सत्य समोर येईल.