Yakub Memon Grave Controversy : सध्या राज्यात चर्चेत असणारा विषय म्हणजे, दहशतवादी याकूब मेमनची (Yakub Memon) कबर. दहशतवादी याकूब मेमनच्या मुंबईतल्या कबरीवर (Yakub Memon Grave Controversy) सुशोभिकरण केल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली आणि प्रशासनाला खडबडून जाग आली. एवढंच नाहीतर सध्या यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले आहेत.
मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये असणाऱ्या याकूब मेमनच्या कबरीला (Yakub Memon Grave Controversy) सजावटीसह आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. कबरीसाठी संगमरवरी दगडातलं बांधकाम, एलईडी लाईट्ससोबतच चोवीस तास पहारा ठेवण्यात आला होता. मुंबईत एका दहशतवाद्याच्या कबरीला एवढी व्हीव्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात येत असल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली आणि एकच खळबळ माजली. प्रशासनानं कारवाईचा सपाटा लावला. मुंबई पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कबरीवरील एलईडी लाईट्स हटवल्या. त्यापाठोपाठ मुंबई महापालिकेचं पथकही घटनास्थळी दाखल झालं. पण त्यावर बीएमसी काहीच कारवाई करु शकत नाही असं महापालिका आयुक्तांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं. बडा कब्रस्तान मुंबई मनपाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही, त्यामुळे महापालिका कारवाई करू शकत नाही, असं मनपा आयुक्त इक्बाल चहल यांनी माझाला सांगितलं आहे.
ज्याच्या कबरीवरुन एवढं राजकारण तापलं आहे. तो याकूब मेमन (Yakub Memon) नेमका आहे तरी कोण?
दिवस होता 12 मार्च 1993 चा. मुंबई नेहमीप्रमाणेच घड्याळाच्या काट्यावर धावत होती. पण अचानक एका पाठोपाठ एक 12 स्फोट झाले आणि मुंबई थांबली. हा दिवस मुंबईकर कधीच विसरु शकणार नाही. दहशतवाद्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट (1993 Mumbai Blast) घडवले. या जखमा अजूनही मुंबईकरांच्या मनात ओल्या आहेत. हा दिवस आठवताच मुंबईकरच नाही, तर अवघ्या देशवासियांच्या अंगावर काटा येतो. मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटानं अवघ्या देशाला हादरवलं. देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट होता. या हल्लात 257 जणांचा मृत्यू झाला होता, तर सातशेहून अधिकजण या स्फोटात जखमी झाले होते. या भयान हल्ल्याच्या कटू आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात आहेत. या बॉम्बस्फोटात अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं. अनेक निष्पाप बळी गेले.
मुंबई हादरवणाऱ्या या हल्ल्यांमागचा सुत्रधार होता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम. या हल्ल्यांमागे दाऊदचा संबंध असल्याचं समोर आलं. पण याप्रकरणातील सर्व आरोपी फरार झाले. त्यामध्ये एक कुटुंब होतं. ते म्हणजे मेमन कुटुंब. मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार टायगर मेमनचं कुटुंब. टायगर मेमन आणि याकूब मेमन दोघं भाऊ. यांचा या बॉम्बस्फोटाच्या कटामागे हात होता. बॉम्बस्फोटानंतर हे दोघे भाऊ आपल्या कुटुंबासह फरार झालं.
12 मार्च 1993 च्या बॉम्बस्फोटाआधी (1993 Mumbai Blast) मुंबईतील माहिम परिसरातील अल हुसैनी इमारतीत टायगर मेमन हा आई-वडील आणि याकूब या आपल्या लहान भावासोबत राहत होता. मुंबई बॉम्बस्फोटच्या कटानुसार टायगर मेमनने याकूब मेमनसोबत कुटुंबातील सर्व सदस्यांना भारताबाहेर पाठवलं. कुटुंबातील सगळेच जण पहिल्यांदा दुबईला, त्यानंतर सौदी आणि शेवटी पाकिस्तानात गेले.
जावाजावांच्या भांडणात याकूब लटकला फासावर
असं सांगितलं जातं की, टायगर मेमनची पत्नी आणि याकूबची पत्नी यांच्यात सारखे खटके उडायचे. फरार झाल्यानंतर या खटक्यांचं प्रमाण आणखी वाढलं होतं. याकूबची पत्नी दररोज टायगर आणि त्याच्या पत्नीची याकूबकडे तक्रार करत असे. "तुमच्या भावामुळे आपल्याला हे दिवस पाहावे लागत आहेत. आपण आपल्या नातेवाईकांपासूनही दुरावलो. ना कुणाच्या लग्नसमारंभात जाऊ शकत, ना कुणाच्या अंत्यसंस्काराला. याला आयुष्य म्हणायचं का? आता फक्त तुमच्या भावाच्या तुकड्यांवर आयुष्य काढावं लागेल." यामुळे त्रस्त झालेला याकूबनं भारतात परतण्याचा निर्णय घेतला. याकूबच्या या निर्णयामागे जावा-जावांमधील भांडण हेही एक कारण होतं. रोजच्या भांडणांपासून त्याला सुटका हवी होती आणि त्याने टायगर मेमनसोबत बंडखोरी करुन भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मेमन कुटुंबाच्या एका निकटवर्तीयाच्या म्हणण्यानुसार, जर जावा-जावांमध्ये भांडणं झाली नसती, तर कदाचित याकूब भारतात येण्यासाठी तयार झालाच नसता.
कोण होता याकूब मेमन? (Know Who is Yakub Memon)
मुंबईला हादरवणाऱ्या 12 मार्च 1993च्या बॉम्बस्फोटांचा (1993 Mumbai Blast) मुख्य गुन्हेगार टायगर मेमनचा भाऊ म्हणजेच, याकूब मेमन. पूर्ण नाव याकूब अब्दुल रजाक मेमन. 1993 साली झालेल्या मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांमागे याचाही मोठा हात होता. 12 मार्च 1993 च्या बॉम्बस्फोटाआधी मुंबईतील माहिम परिसरातील अल हुसैनी इमारतीत टायगर मेमन हा आई-वडील आणि याकूब या आपल्या लहान भावासोबत राहत होता. मुंबई बॉम्बस्फोटच्या कटानुसार टायगर मेमनने याकूब मेमनसोबत कुटुंबातील सर्व सदस्यांना भारताबाहेर पाठवलं. कुटुंबातील सगळेच जण पहिल्यांदा दुबईला, त्यानंतर सौदी आणि शेवटी पाकिस्तानात गेलं. असं सांगितलं जातं की, टायगर मेमन आणि याकूब यांच्या पत्नींमध्ये सतत भांडणं होत होती. त्याला कंटाळून याकूबनं भारतात परतण्याचा निर्णय घेतला.
भाऊ टायगर मेमन आणि अयूब मेमन यांना कराचीतच सोडून याकूब मेमन भारतात परतला. त्याच्यासोबत दोन भाऊ वगळता संपूर्ण कुटुंब होतं. 1994 साली नेपाळच्या काठमांडू विमानतळावरुन याकूबला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर याकूबला अटक करण्यात आली. याकूब पेशानं चार्टर्ड अकाऊंटंट होता. भायखाळयामध्ये लहानाचा मोठा झालेल्या याकूबनं कॉन्व्हेंट शाळेत इंग्रजी माध्यमातून त्याचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. अभ्यासात हुशार असलेल्या याकूबनं पुढे वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर पुढं त्यानं चार्टर्ड अकाउंटटच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. पुढे तो चार्टर्ड अकाउंटट झाला. त्यानं बॉम्बस्फोटावेळी पैसे आणल्याचा आरोप आहे. अटक झाल्यानंतर याकूबला आशा होती की, बॉम्बस्फोटात मोठी भूमिका नसल्याने काही वर्षात सुटका होईल. पण तसं झालं नाही.
सध्या याकूबचे दोन भाऊ औरंगाबाद तुरुंगात आहेत. तर टायगर मेमनची पत्नी पुणे तुरुंगात आहे. दिल्लीत अटक केल्यानंतर पत्नी राहीन, भाऊ आणि नातेवाईकांविरोधात टाडाअंतर्गत खटला चालवला गेला. याकूबची पत्नी राहीन हिला कोर्टाने सोडून दिलं. मात्र, याकूबला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. बॉम्बस्फोटासाठी ज्या 12 जणांना फाशीची शिक्षा सुनावली त्यापैकी एक याकूब मेमन. याकूबनं या कारस्थानात पैशांचे व्यवहार पाहण्यापासून दहशतवाद्यांना मदत करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. याकूबवरील हे आरोप न्यायालयात सिध्द झाल्यानं टाडा न्यायालयानं त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.
फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर याकूबनं राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली. राष्ट्रपतींनी 2013 साली त्याची दया याचिका फेटाळून लावली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात मध्यरात्री पार पडलेल्या सुनावणीत याकूबच्या फाशीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. 30 जुलै 2015 रोजी नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात बॉम्बस्फोटातील निष्पाप जीवांचा दोषी असलेल्या याकूब मेमनला फासावर लटकवण्यात आलं.
1993 Mumbai Blast : एका पाठोपाठ 12 बॉम्बस्फोट, कधी आणि कुठे?
पहिला स्फोट : 12 मार्चच्या दुपारी मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीबाहेर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी देशाला हादरवणारा पहिला बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाचा आवाज काही किलोमीटरपर्यंत पोहोचला. स्टॉक एक्सेंजच्या 29 व्या मजल्यावरील माणूसही जागच्या जागी पडला, एवढा मोठा हा स्फोट होता. स्फोटाच्या आजूबाजूला रक्ताचा सडा वाहू लागला. स्फोट झालेल्या ठिकाणी जवळपास 2 हजार लोकांची गर्दी होती. बेसमेंटच्या पार्किंगमध्ये आरडीएक्सनी भरलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजबाहेरील या स्फोटात 84 लोकांचा मृत्यू आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले.
दुसरा स्फोट : दुपारी 2.15 वाजता, नरसी नाथ स्ट्रीट
तिसरा स्फोट : दुपारी 2.30 वाजता, शिवसेना भवन
चौथा स्फोट : दुपारी 2.33 वाजता, एयर इंडिया बिल्डिंग
पाचवा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, सेंच्युरी बाजार
सहावा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, माहिम
सातवा स्फोट : दुपारी 3.05 वाजता, झवेरी बाजार
आठवा स्फोट : दुपारी 3.10 वाजता, सी रॉक हॉटेल
नववा स्फोट : दुपारी 3.13 वाजता, प्लाझा सिनेमा
दहावा स्फोट : दुपारी 3.20 वाजता, जुहू सेंटॉर हॉटेल
अकरावा स्फोट : दुपारी 3.30 वाजता, सहार विमानतळ
बारावा स्फोट : दुपारी 3.40 वाजता, विमानतळ सेंटॉर हॉटेल
बॉम्बस्फोटानंतर काय झालं?
- 4 नोव्हेंबर 1993 रोजी 10 हजार पानांचं 189 जणांविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल
- 19 नोव्हेंबर 1993 रोजी प्रकरणं सीबीआयकडे सुपूर्द
- 19 एप्रिल 1995 रोजी मुंबईतील टाडा कोर्टात सुनावणी सुरु
- टाडा कोर्टाकडून आरोपींविरोधात आरोप निश्चिती
- ऑक्टोबर 2000 मध्ये सरकारी पक्षाच्या साक्षीदारांचे जबाब घेतले गेले
- ऑक्टोबर 2001 मध्ये सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्ण
- सप्टेंबर 2003 मध्ये संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण
- सप्टेंबर 2006 मध्ये कोर्टाने निर्णय देणं सुरु केलं
- या प्रकरणात एकूण 123 आरोपी होते, ज्यामधील 12 जणांना कनिष्ठ कोर्टाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. यामधील 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, ज्यामधील दोघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर 68 जणांना
- जन्मठेपेहून कमी शिक्षा सुनावली गेली होती. मात्र, त्यातील 23 जण निर्दोष सुटले.
- नोव्हेंबर 2006 मध्ये बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला पिस्तूल आणि एके-56 रायफल्स ठेवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
- 1 नोव्हेंबर 2011 मध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली
- सुप्रीम कोर्टात 10 महिने सुनावणी सुरु राहिली
- ऑगस्ट 2012 मध्ये सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला. 2006 साली मुंबई कोर्टाने सुनावणीत निर्णय दिला, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश होता. त्यामध्ये याकूब मेमन, यूसूफ मेमन, इसा मेमन आणि रुबिना मेमन
- यांचा समावेश होता. या सर्वांवर बॉम्बस्फोटाचा कट आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
- मुंबईच्या टाडा कोर्टाने याकूबला फाशी सुनावल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. अनेक वाद-विवादांनंतर अखेर 30 जुलै 2015 रोजी सकाळी 7 वाजता याकूब मेमनला फाशी देण्यात आली.