मुंबई : सरकारने बुधवारी (20 फेब्रुवारी) मंत्रिमंडळ बैठकीत प्रलंबित पोलीस उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीतील उमेदवारांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला. पोलीस उपनिरीक्षक मर्यादित परीक्षेच्या माध्यमातून यापूर्वी 982 जणांना नियुक्ती देण्यात आली. आता गुणवत्ता यादीतील आणखी 636 जणांना सरकारने पोलीस उपनिरीक्षकपदी सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व उमेदवारांनी गुरुवारी (21 फेब्रुवारी) मुंबै बँकेत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार प्रदर्शन केले.
राज्यातील पोलीस उपनिरीक्षक भरतीचा वाद चांगलाच गाजला होता. सरकारने 2016 मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित परीक्षेच्या माध्यमातून यापूर्वी 982 उमेदवारांना नियुक्ती दिली आहे. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील आणखी 636 उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे कोट्यातील वेळोवेळी रिक्त होणाऱ्या पदांवर टप्प्याटप्प्याने सामावून घेण्यात येणार आहेत.
यासंदर्भात भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि मराठा ठोक मोर्चाचे आबा पाटील पाठपुरावा करत होते. आता सरकारने 636 जणांना पदोन्नतीने सामावून घेण्याचा निर्णय घेतल्याने, गेल्या सहा महिन्यांपासून या विषयावर निर्माण झालेला तिढा सुटला आहे. हा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) निदर्शनास आणून, त्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.