मुंबई: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील छात्र संघाचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारच्या वरळीत होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. वरळीतील जनता शिक्षण संस्थेत कन्हैयाची सभा प्रस्तावित होती. मात्र आता त्याऐवजी चेंबूरच्या टिळकनगरमधील सभागृहात उद्या कन्हैय्या कुमारची सभा होणार आहे.
सभेसाठी घालून दिलेल्या अटींची पूर्तता न केल्याने पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं कळतंय.
सध्या पोलिसांच्या अटीनुसार ओळखपत्र आणि निमंत्रणाशिवाय सभेच्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही. तसंच आयोजित सभा संध्याकाळी ६ वाजेपर्यंत संपवावी ही देखील अट घालण्यात आली आहे.
त्याचबरोबर कन्हैय्या कुमारच्या पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाबाबतही सांशकता आहे. सध्या सिंहगड रोडवरील राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र पोलिसांनी घातलेल्या अटींमुळे कार्यक्रमाचं स्थळ बदलण्याची शक्यता आहे.