मुंबई : सरकारच्या पाठिंब्याशिवाय सुरतच्या (Surat) हिरे व्यापाऱ्यांनी अंदाजे 3 हजार 400 कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र तयार केले आहे. दरम्यान, या इमारतीमुळे मुंबई आणि राज्य सरकारला कराच्या रुपात मोठा धक्का बसणार आहे. याचंकारण म्हणजे मुंबईतील (Mumbai) स्थानिक हिरे व्यापारी आपला व्यवसाय सुरतच्या दिशेनं वळवण्यास सुरुवात केलीय. 


सुरतमध्ये मागील अनेक वर्षांपासून हिऱ्यांची निर्मिती केली जाते. पण सुरतमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्यामुळे हा व्यापार मुंबईतून केला जात होता. हिऱ्यांची निर्मिती जरी सुरतमध्ये होत असली तरी त्याचा मुख्य व्यापार हा मुंबईतून होत होता. पण आता सुरतमध्ये डायमंड बोर्स नावाचं मोठं व्यापाराचं केंद्र सुरु करण्यात आलंय. त्यामुळे मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांचा कल आता सुरतकडे चाललाय. 


महाराष्ट्राला 17 हजार कोटींचा फटका


अमेरिकेतील पेंटागाॅन इमारतीपेक्षाही सुरत डायमंड बोर्सची इमारत ही मोठी आहे. सुरत शहराला डायमंड सिटी म्हंटले जाते. सुरतशहरातील हिरे कारखान्यांमध्ये कापले जाणारे हिरे देशातच नव्हे तर जगभरातील विविध देशांमध्ये निर्यात केले जातात.  या हिऱ्यांच्याव्यवसाय लाखोंना रोजगार दिला जातो.  मात्र, मुंबईतील हा व्यवसाय आता हळूहळू सुरतकडे वळण्याची शक्यता आता वर्तवली जातेय. त्याचं मुख्य कारण म्हणजे ही डायमंड बोर्स इमारत. अशातच, किरण डायमंड एक्सपोर्टचे अब्जाधीश व्यवसायिक वल्लभभाई लखानी यांनी बीकेसीतील आपला व्यवसाययाच इमारतीत हलवण्याचा निर्णय घेतलाय. ज्यामुळे महाराष्ट्राला 17 हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. 


सध्याची डायमंड निर्यातीची स्थिती


मुंबईमध्ये डायमंड निर्यात करण्यासाठी अनेक पर्याय होते.  अशात काही वर्षांपूर्वी अनेक हिरे व्यापारी डायमंडच्या व्यावसायासाठी मुंबईत स्थलांतर झाले. मागील काही वर्षात सुरत डायमंडची मोठी बाजारपेठ म्हणून समोर येताना दिसली आणि नंतर अनेकांचा कल तिकडे वळला. सध्याची जर परिस्थिती पाहायची तर सुरतमधून 90 टक्के डायमंड निर्यात होतात.  सोबतच गुजरात सरकारकडून सोयी सुविधा देखील चांगल्या देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा कल तिकडे वळण्याची शक्यता अधिक आहे. 


कशी आहे डायमंड बोर्स ही इमारत


सुरत डायमंड बोर्ससाठी 14 मजल्यांचे 9 टॉवर्स 67 लाख चौरस फूट जागेवर उभारण्यात आलेत. टॉवर्समध्ये विविध हिरे कंपन्यांची  4 हजार 300 कार्यालये आहेत. ही इमारत तयार होण्याआधीच ही कार्यालये हिरे व्यापाऱ्यांनी विकत घेतली होती. मुंबई आणि सुरतमधील व्यापाऱ्यांना एकाच छताखाली आणता यावे यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतय. तसेच मुंबईतील वाढती वाहतुकीची समस्या, कर्मचाऱ्यांना प्रवास करायला  होणाऱ्या अडचणी आणि घरांच्या अव्वाच्या सव्वा किंमतींमुळे बीकेसीतील व्यापारी सुरतकडे स्थलांतरीत होत असल्याचं चित्र आहे. 


कर्मचाऱ्यांना सोयी मिळाव्यात याकरीता त्यांना तिथे फ्लॅट्स देखील देण्यात आले. हे सर्व फ्लॅट्स सर्व सोयींनी युक्त असे आहेत.  जगातील सर्वात मोठे कस्टम हाऊस सुरतमध्ये तयार करण्यात आले. सोबतच सुरत विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू होणार आहेत. त्यामुळे सुरतचे हिरे व्यापारी आता मुंबईपेक्षा सुरतमधून जगभरातील हिऱ्यांचा व्यवसाय करू शकतील.  दरम्यान, मुंबईतील काही व्यापारी सुरतला आपला व्यवसाय नेणार असल्याने यावर राज्यात राजकारण रंगताना दिसतंय. पुन्हा व्यवसाय बाहेर जात असल्याने विरोधी पक्षांनी राज्य सरकार टिकेची झोड उठवली आहे.


 राज्यातून सुरतला जाणाऱ्या डायमंड व्यापाऱ्यांची संख्या छोटी आहे. मात्र, येत्या काळात जर सोयीसुविधा चांगल्या असल्या आणि गुजरात सरकारकडून व्यवसायाला चालना मिळवण्याचे चांगले प्रयत्न केले गेले तर ही संख्या येत्या काळात वाढू शकेल. अशातच राज्य सरकारनं अशा व्यवसायांना चालना देणं आणि वन विन्डो सिस्टिम तयार करत व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवणे देखील गरजेचे आहे. 


हेही वाचा : 


Aaditya Thackeray : वेदांता नेलं, वर्ल्डकपची मॅच नेली, 40 गद्दार पळवले, आता हिरे व्यापारांवरुन आदित्य ठाकरेंचं शिंदे सरकारवर टीकास्त्र