Mumbai: 'दक्षिण आशियातील शहरांमध्ये हवामानपूरक प्रकल्पांची रचना करणे आणि त्यासाठी वित्तपुरवठा वाढवणे’ या विषयावर एक विशेष कार्यशाळा नुकतीच मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विविध देशांतील महानगरपालिका, तसेच भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप हा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आला होता. या समारोपीय कार्यक्रमाला मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, 'एमसीजीएम सेंटर फॉर म्युनिसिपल कॅपेसिटी बिल्डिंग अँड रिसर्च'चे महासंचालक डॉ. रमानाथ झा, 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स' या संस्थेचे संचालक डॉ. हितेश वैद्य उपस्थितीत होते.


या कार्यशाळेसाठी भूतान (Bhutan), बांग्लादेश (Bangladesh), नेपाळ (Nepal) आणि श्रीलंका (Srilanka) या देशांमधील महानगरपालिकांचे महापौर आणि आयुक्त उपस्थित होते. तर भारतातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधींनी देखील या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. मुंबई पालिकेच्या उद्यान विभागाने उपस्थित प्रतिनिधींसमोर संगणकीय सादरीकरणाच्या (Computer Presentation) माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेने बनवलेल्या 'मुंबई वातावरण कृती आराखड्या'चे सादरीकरण केले. समारोप कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात विविध देशांमधून आलेल्या प्रतिनिधींनी मुंबई पालिकेच्या उद्यान आणि पर्यावरण विषयक कार्याबाबत माहिती जाणून घेतली.


मुंबई शहराला उष्णता (Heat), भूस्खलन (Landslide), पूर (Flood), हवा प्रदुषणासह (Air Pollution) विविध नैसर्गिक आपत्तींचा (Natural Disasters) सामना करावा लागतो. या आपत्तींचा सामना करण्यासाठी मुंबई पालिकेने (BMC) कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये वातावरणपूरक प्रकल्पांची (Environmental Projects) रचना, शहरातील वाढत्या उष्णतेवर परिणामकारक उपाय, ग्रीन हाऊस (Green House) याबद्दलची माहिती संगणकीय सादरीकरणाच्या (Computer Presentation) माध्यमातून उपस्थितांना देण्यात आली. दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमादरम्यान विविध देशातून आलेल्या प्रतिनिधींनी पालिका राबवत असलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांचे कौतुक केले, तसेच हे उपक्रम अनुकरणीय असल्याचेही अनेकांनी नमूद केले.


ऊर्जा (Energy), वाहने (Vehicles) आणि कचऱ्यापासून (Waste) होणारे प्रदुषण 2050 पर्यंत शुन्यावर आणण्याचे मुंबई पालिकेचे उद्दिष्ट आहे, यासाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्यात येतील. याबरोबरच शहरातील पूर (Flood) आणि जल संसाधन व्यवस्थापन (Water Resource Management), हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध प्रकल्पांची उभारणी, जैवविविधतेचे जतन करण्यासाठी उपाययोजनांसह वातावरणपूरक विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.


हेही वाचा:


Mumbai Local: मुंबई महापालिका निवडणुकीआधी रेल्वेकडून मोठी घोषणा, वंदे मेट्रो श्रेणीतल्या 238 एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत येणार