Trupti Shete Metro Pilot : मेट्रो 7 (Metro 7) आणि मेट्रो 2 A (Metro 2 A) मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते मुंबई मेट्रोच्या एका टप्प्याचं उद्घाटन पार पाडलं. पंतप्रधान मोदी यांनी ज्या मेट्रोने प्रवास केला ती मेट्रो 27 वर्षीय तृप्ती शेटे (Trupti Shete) हिने चालवली. तीन वर्ष नोकरीच्या शोधात असलेल्या तृप्तीला आता कुठे नशिबाची साथ मिळाली आहे, असं म्हणावं लागेल. विशेष म्हणजे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाच्या वेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रवास केला ती मेट्रोदेखील तृप्तीने चालवली होती.


तृप्तीने चालवली पंतप्रधानांनी प्रवास केलेली मेट्रो


अंधेरी येथील गुंदवली स्थानकावरुन मुंबई मेट्रो मार्ग 2A आणि 7 च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मेट्रोमध्ये प्रवास केला ती मेट्रो तृप्ती शेटे हिने चालवली. आपल्याला यावेळी खूप आनंद झाला अशी प्रतिक्रिया तृप्ती हिने 'इंडियन एक्सप्रेस'सोबत बोलताना दिली आहे. तिने पुढे सांगितलं की, 'मला भीती वाटली नाही. यावेळी खूप उत्साही होते, कारण मला माझ्या कामावर विश्वास आहे. मी एक अनुभवी मेट्रो चालक आहे.'


उद्धव ठाकरे यांची मेट्रो फेरी देखील तृप्तीनेच चालवली


रिपोर्टनुसार, मुंबई मेट्रो 2A आणि 7 च्या ट्रेन चालकांच्या ताफ्यात एकूण 91 जण आहेत. या ताफ्यातील 21 महिला मेट्रो ट्रेन पायलट आहेत. यापैकीच एक म्हणजे तृप्ती शेटे. तृप्ती हिला पंतप्रधान मोदी यांनी प्रवास केला ती मेट्रो चालवण्याची संधी मिळाली. 2022 च्या एप्रिल महिन्यामध्ये या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाच्या वेळी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मेट्रो फेरीदेखील तृप्तीनेच चालवली होती.


'हा माझ्यासाठी मोठा सन्मान'


तृप्तीने 'इंडियन एक्सप्रेस'सोबत बोलताना सांगितले की, 'पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मेट्रोमध्ये प्रवास करत होते तेव्हा मला मेट्रो ट्रेन चालवण्याची संधी मिळाल्याने मी खूप उत्साहित आणि आनंदी होते. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. माझे आईवडील आणि सर्व कुटुंबियांना माझा अभिमान आहे.'


तीन वर्ष नोकरीच्या शोधात


मूळची औरंगाबादची असणारी तृप्ती शेटे हिचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला आहे. ती सध्या 27 वर्षांची आहे. तिने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आणि पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. तृप्तीने 2020 मध्ये हैदराबादमध्ये मेट्रो ट्रेन पायलट होण्यासाठी प्रशिक्षण घेतले. इंजिनिअरिंगची पदवी मिळाल्यानंतर तीन वर्ष ती नोकरीच्या शोधात होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Job Report : कामातून मन उडालं, 5 पैकी 4 जणांना बदलायचीय नोकरी; LinkedIn चा नवा रिपोर्ट