Mumbai Congress News: मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच महाविकास आघाडीनंही (Maha Vikas Aghadi) महायुतीविरोधात एकत्र येत आगामी लोकसभेसाठी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. अशातच दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत (Mumbai South Lok Sabha Constituency) मात्र, महाविकास आघाडीत काहीशी धुसफूस असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून (Thackeray Group) वारंवार दक्षिण मुंबई मतदारसंघावर दावा सांगण्यात आल्यापासूनच काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच याच नाराजीतून काँग्रेस नेते मिलिंद देवरा (Milind Deora) काँग्रेसची (Congress) साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत (Shinde Group) प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे. मुंबईतील 10 माजी नगरसेवक, 25 पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा आजच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. माजी खासदार मिलींद देवरा यांचा दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिलिंद देवरा सकाळी 11 वाजता सिद्धीविनायकाचं सपत्नीक दर्शन घेतील आणि त्यानंतर आपली भूमीका माध्यमांसोर स्पष्ट करतील, अशी माहिती मिळत आहे. त्यानंतर 10 माजी नगरसेवक, 25 पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते हे वर्षा बंगल्यावर प्रवेशाकरता जातील, असं बोललं जात आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, देवरा यांना शिंदे गटाकडून अद्याप दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचं आश्वासन देण्यात आलेलं नाही. या मतदारसंघाकरता भाजपही आग्रही असल्यानं येणाऱ्या काळात मिलिंद देवरा यांच्यावरुन भाजप-शिंदे गटातही रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिलिंद देवरा नाराज? काँग्रेसची साथ सोडणार?
भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत, पण तेच आता एकमेकांविरोधात उभे ठाकतात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला कारण ठरतंय ते लोकसभेचं जागावाटप. मुंबईतील मतदारसंघांवर काँग्रेस आणि शिवसेनेकडून दावा केला जात आहे. याच दाव्यांवरुन आघाडीत बिघाडी होते की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघावर आपला दावा सांगितला. तेव्हापासूनच काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांचे नाराजीचे सूर उमटू लागले. अशातच आता हेच मिलिंद देवरा (Milind Deora) काँग्रेसची साथ सोडणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा भाजप आणि शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर आली आहे. दक्षिण मुंबईवर ठाकरे गटानं दावा केल्यानं मिलिंद देवरा नाराज असल्याची माहिती मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं की, दक्षिण मुंबईवर आमचा (ठाकरे गटाचा) दावा आहे आणि तिकडे उमेदवार देखील आमचाच असणार आहे, मिलिंद देवरांच्या नाराजीसाठी हेच कारण ठरलं अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. आता आपण जर लक्षात घेतलं तर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट असे तीन पक्ष एकत्र आहेत. अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही, अशातच संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मिलिंद देवरा यांनी दुसरी वाट निवडल्याचं बोललं जात आहे.