मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा तर घेतला पण परप्रांतियांच्या मुद्द्यांचं काय? हा सवाल विचारण्याचं कारण म्हणजे भविष्यात भाजपसोबत मनसेला युती करायची असेल तर प्ररप्रांतियांचा मुद्दा सोडावा अशी अट रावसाहेब दानवे यांनी घातली आहे. त्यामुळे मूळ भूमिकेपासून दूर जाणं मनसेला परवडेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मराठी माणसांच्या मराठीच्या हक्कासाठी उभा राहिलेला पक्ष आता भाजपसोबत जाण्यासाठी बदलावं लागणार एवढी नक्की झालं आहे. कारण हिंदुत्वाच्या व्याख्येत मराठी माणसांसह गुजराती, जैन, मारवाडी आणि उत्तर भारतीयही येतात. 


मनसेच्या स्थापनेनंतर मराठीच्या मुद्द्यांवर लढताना रेल्वे परीक्षेच्या दरम्यान उत्तर भारतीयांना मारहण झाली होती. आधी भूमिपुत्रांना न्याय मग परप्रांतियांना, असा नारा मनसेने दिला होता. दिल्लीपासून गल्लीपर्यंत मनसेचा राडा गाजला होता दिल्लीत मनसेच्या राड्याचे पडसाद पडले. पण राज ठाकरेंही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.


त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसे आक्रमक राहिली. पण शिवसेना-भाजपच्या युतीदरम्यान म्हणा किंवा महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी बोला सर्व पक्षांना आपली भूमिका मवाळ करावी लागली. तसंच किमान समान कार्यक्रम ठरवूनच महाविकास आघाडीतले सर्व पक्ष एकत्र आले तसंच काहीसं भाजप-मनसे युतीत होऊ शकतं. 



उत्तर भारतीय महापयांत या कार्यक्रमात राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांबद्दलची भूमिका स्पष्ट केली होती. मुंबई झालेल्या एका कार्यक्रमात उत्तर भारतीयांमध्ये असलेले समज गैरसमज यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक उत्तर भारतीयांनी मनसेत प्रवेश केला होता. दानवेंनी जी अट घातली आहे त्या दिशेने मनसेने केव्हाच वाटचाल केली आहे. अधिकृत भूमिका कोणताही पक्ष जाहिरपणे घेऊ शकत नाही, जर अशी भूमिका घेतली तर कट्टर कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता असते.
 
राज्यात सध्या महाविकास आघाडीतच्या निमित्तानी तीन पक्ष घट्ट मित्र झाले आहेत, तर दुसरीकडे मनसे-भाजप युतीचे संकेत मिळत आहेत. प्रत्येक पक्षाने जाहिररित्या सांगितलं नसलं तरी मूळ भूमिका बाजूला ठेऊन एकत्र संसार करत आहेत. त्यामुळे भाजपसोबत मैत्री करताना मनसेने काही भूमिका बदलल्या तर नवल वाटायला नको.