मुंबई : मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातून हिरावण्यासाठी भाजप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. कारण मनसेसोबत युती करण्याबाबत कोणताही भाजप नेता स्पष्टपणे नकार देत नाही. "सध्यातरी स्वबळावर लढण्याची तयारी आहे, मात्र मनसेला सोबत घ्यायचं की नाही यासंदर्भात निवडणुकीच्या वेळी निर्णय घेऊ," असं सूचक वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. तर मनसेची साथ मिळाली तर स्वागत कराल का असा प्रश्न विचारला असता, "झेंडाही आमचाच आणि काठीही आमचीच असेल, त्यामुळे भगवा हा भाजपचाच फडकेल यात शंका नाही," असं उत्तर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिल.


आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. यासंदर्भात मुंबईत काल भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी अतुल भातखळकर यांच्यावर पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी  प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली. तर मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकावणारच असा निर्धार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला.

मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. परंतु शिवसेनेचा गड असलेली मुंबई महापालिकेवर झेंडा फडकावण्यासाठी भाजप आतापासूनच तयारीला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार की भाजपला सोबत घेणार असा प्रश्न प्रवीण दरेकर यांना विचारला असता ते म्हणाले की, आजतरी भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. निवडणूक आल्यावर त्यावेळी पक्ष योग्य ती भूमिका घेईल."


तर या निवडणुकीत मनसेची साथ मिळत असेल तर स्वागत कराल का? असा प्रश्न अतुल भातखळकर यांना विचारण्यात आला. त्यावर "भगवाही आमचाच असेल आणि काठीही आमचीच असेल. आम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही. त्यामुळे स्वबळावर भाजप भगवा फडकवेल," अशी प्रतिक्रिया अतुल भातखळकर यांनी दिली.


संबंधित बातम्या