मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 2022 ला होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीसाठी आतापासूनच भाजपने कंबर कसली आहे. यासाठी आज मुंबई भाजप कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना, मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकवू असा विश्वास व्यक्त केला.


राजाचा जीव पोपटात, तर काहींचा जीव मुंबई महापालिकेत आहे. आता औदार्य नाही, प्रत्येक वार्डात, बूथमध्ये नेता नेमणार. प्रत्येक बूथमध्ये राजकीय कार्यकर्ते घडवा. युवा मोर्चाने प्रत्येक बूथमध्ये 50 युवा आणि महिला मोर्चाने 100 घरात महिलांना जोडलं पाहिजे. ज्याच्या डोक्यात सत्ता गेली त्याचं पतन निश्चित आहे. जनतेसाठी तो माज तोडावाच लागेल. 2022 साली मुंबई महानगरपालिकेवर भगवाच फडकेल, पण भाजपचा, असा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.


कोरोना आटोक्यात आलाय म्हणून पाठ थोपटवून घेणाऱ्यांना सवाल आहे की देशात सर्वाधिक केसेस मुंबईत, महाराष्ट्रात का? देशातील 40 टक्के मृत्यू महाराष्ट्रात का? फक्त मुंबईत 10 हजार मृत्यू हे नेमकं कोणाचं कर्तृत्व आहे? महाराष्ट्रसारखी भीषण अवस्था कुठेच नव्हती. कोरोनाच्या नावाने अनेकांनी आपलं भलं करून घेतलं, मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे. आम्ही टीका करणार नाही म्हंटलं होतं पण आता यांची लक्तरे वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं.


वीज बिलं कमी करून देणार अशी घोषणा केल्यानंतर हे सरकार शब्दावरून फिरलं. हे विश्वासघातकी सरकार आहे. केंद्राने आणलेल्या योजनेत चार चांगल्या राज्यातील युटिलिटीमध्ये महाराष्ट्र हे राज्य होते. हे सरकार सावकारांसारखे गरीबांकडून पैशे उकळण्याचे काम करत आहे. गरीब मरत असतांना या सरकारने बदल्यांचा बाजार मांडला, असं फडणवीस यांनी म्हटलं.



टाईमपास करायचा असेल तर कांजूरमार्ग


बिहारमध्ये भाजपने विजय मिळवला, कारण तिथला सामान्य माणूस गरीब कल्याण योजनेचा लाभार्थी आहे. आपण बिहार, मणिपूर, उत्तरप्रदेश, गुजरात, तेलंगणा, कर्नाटकात जिंकलो. उत्तर, पश्चिम, पूर्व, दक्षिणेत आपण जिंकलो कारण लोकांना कर्मयोग आवडतो, बोलघेवडेपणा आवडत नाही. राज्यात सर्व रखडलेले प्रकल्प आपण पूर्णत्वास नेले. पृथ्वीराज चव्हाण नेहमी दिल्लीतून हात हलवत यायचे. ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड, मेट्रो, वांद्रे - वर्सोवा सी लिंक, रोरो सर्विस, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प या कामांची मुहूर्तमेढ रोवली. धाराविचा प्रश्न सोडवला, पण यांनी त्याचं रिटेंडरिंग केलं. 800 कोटी रुपये मोजून आपण रेल्वेची जागा विकत घेतली म्हणून धारावी प्रकल्प कोणीच थांबवू शकत नाही. नवी मुंबईचं एअरपोर्टचं 20 वर्षांपासून रखडलेले काम आपण सुरू केले, असा पाढाच फडणवीसांनी वाचला. इच्छा तिथे मार्ग पण आता नवीन वाकप्रचार ऐकला, "टाईमपास करायचा असेल तर कांजूरमार्ग"; असा टोलाही फडणवीसांचा ठाकरे सरकारला लगावला.


महाविकास आघाडी सरकार विकासविरोधी सरकार


स्वतःला पर्यावरणवादी म्हणवणाऱ्यांनी मुंबई महापालिकेच्या सत्तेत किती अनधिकृत काम केले? किती नदी नाले बुजवले? मेट्रोच्या कामाला विरोध कोणी केली? 50 हजार कोटींच्या गुंतवणुकीची बुलेट ट्रेनला विरोध करून राज्याचं नुकसान केलं. त्यासाठी लागणारं लोखंड, सिमेंट हे ओल्याच राज्यातून येणार होतं, आंदोलनं केल्याने राज्यात पैसा गुंतवणूक करणार कोण? असे सवाल उपस्थित करत हे विकासविरोधी सरकार आहे. जनतेचा असल्या आंदोलनांना पाठिंबा नाही. त्यांना मेट्रो आणि बुलेट ट्रेन हवीय, असं त्यांनी म्हटलं.