मुंबई : मुंबईत एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 55 वर्षीय प्रियकराने आपल्या 58 प्रेयसीच्या घरात घुसून तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. एवढंच नाही तर महिला जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळल्यानंतर आरोपीने क्रूरपणे तिचे केस कापले. त्यानंतर सोबत आणलेला सुतळी बॉम्ब स्वत:च्या तोंडात फोडून घेतला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


ही धक्कादायक घटना मुंबईतील मालाडमधली कुरार विलेज येथील पुष्पा पार्कमध्ये घडली आहे. इथल्या इमारतीमधील एक 58 वर्षीय घटस्फोटीत महिला तिच्या 80 वर्षीय आई, दोन मुली आणि एका मुलासोबत राहते. या महिलेचे 55 वर्षीय वाहन चालक सचिन चौहान यांच्याशी प्रेमसंबंध होते. जवळपास 15 वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध असल्याने आरोपी सचिन चौहानचे महिलेच्या घरी येणे जाणे होते.


याच दरम्यान 1 नोव्हेंबरला सचिन चौहान प्रेयसीला भेटाण्यासाठी तिच्या घरी गेला होता. परंतु तिच्या आईने सचिनला घरात घेण्यास नकार दिला. यावरुन सचिनसोबत त्या महिलेचे आणि तिझ्या आईचे कडाक्याचे भांडण झाले. नंतर 15 नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी सात वाजता ही महिला कामावर जाण्यासाठी निघताच सचिन चौहानने घरात प्रवेश केला. काही कारणाने पुन्हा सचिन आणि त्या महिलेमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण सुरु असतानाच सचिन चौहानने आपल्यासोबत आणलेल्या चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर, चेहऱ्यावर आणि अंगावर सपासप वार केले. एवढंच नाही तर क्रूरपणे महिलेचे केस देखील चाकूने कापले. यानंतर सोबत आणलेला सुतळी बॉम्ब स्वत:च्या तोंडात फोडून घेतला. यात दोघेही गंभीर जखमी झाले असून दोघांवर कुपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


या दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. सध्या आरोपीविरोधात आयपीसीच्या विविध कलामांखाली गुन्हा दाखल करुन पुढील तपास केला जात आहे, अशी माहिती कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी दिली.