डोंबिवली : अवघ्या सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या डोंबिवलीतील एका तरुणीनं पतीला घाबरवण्यासाठी शोले स्टाईलमध्ये टेरेसवरुन उडी मारत असल्याचं नाटक केलं. यावेळी तिच्या पतीनं आणि नातेवाईकांनी तिची समजूत काढत तिला आत घेतलं. डोंबिवलीच्या दत्त नगर भागात बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेनं उपस्थितांचं मात्र चांगलंच मनोरंजन झालं.


डोंबिवलीतील दत्त नगर भागात राहणाऱ्या जोडप्यानं अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. मात्र त्यांच्यात सतत भांडणं होऊ लागली. पती आपलं ऐकत नाही आणि सारखी भांडणं करतो, म्हणून पत्नीनं अनोखी शक्कल लढवली आणि शेजारच्या इमारतीच्या टेरेसवर जाऊन उडी मारत असल्याचं भासवलं. नागरिकांनाही संधी मिळाली आणि ते ही घटना मोबाइलवर चित्रित करण्यात गुंतले. हा शोले स्टाईल थरार बघण्यासाठी इमारतीखाली तोबा गर्दी जमली. यावेळी या महिलेचा पती आणि नातेवाईकांनी टेरेसवर जाऊन तिची समजूत काढली आणि आत घेतलं.

या घटनेनंतर रामनगर पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात नेऊन तिची समजूत काढली आणि कुणाचा त्रास होत असेल तर पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला देत घरी पाठवलं. या घटनेनं डोंबिवलीकरांचं मात्र चांगलंच मनोरंजन झालं.