मुंबई : लॉकडाऊन भले संपुष्ठात येत असला तरी कोरोना व्हायरस नष्ट झालेला नाही, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधून केलेल्या भाषणात सांगितले. मग हा व्हायरस जाणारा तरी कधी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. अजून किती दिवस हा व्हायरस जनतेला छळणार आहे ? वैद्यकीय तज्ञांच्या मते या व्हायरसचे जीवनमान किती असेल तो या भूतलावर किती काळ टिकेल हे अजून कुणी सांगू शकणार नाही कारण त्याबद्दल कुणाला काही माहीतच नाही. 2009 सालात आलेल्या स्वाईन फ्लू या साथीच्या आजाराचे रुग्ण आजही मिळत आहेत. त्यामुळे कोरोना असा तात्काळ नाहीसा होणारा आजार नाही हे सगळ्यांनीच मान्य  केले पाहिजे.


राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आनंद होणे साहजिकच आहे. गेली अनेक महिने कोरोनाच्या व्हायरसने नागरिकांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. आरोग्य विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या दैनंदिन अहवालानुसार राज्यात 6 हजार 738 नवीन रुग्णांचे निदान झाले असून त्यापेक्षा अधिक म्हणजे 8 हजार 430 रुग्ण बरे होऊन उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर 91 कोरोनाबाधितांचा  मृत्यू झाला आहे, त्यामुळे राज्यातील मृत्युदर 2.62% एवढा आहे.


पुढचे 60 दिवस दक्ष राहणे गरजेचे


राज्याचे वैद्यकीय सल्लागार आणि जागतिक आरोग्य परिषदेच्या साऊथ आशिया विभागीय कार्यालयात 4 वर्षे सहाय्यक विभागीय संचालक म्हणून काम पाहणारे डॉ सुभाष साळुंखे सांगतात की, "सध्या राज्यात चांगले वातावरण असले तरी आपल्याला पुढचे 60 दिवस दक्ष राहणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे आमची दोन दिवसांपूर्वी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजि सोबत जी बैठक झाली त्यामध्ये व्हायरस मध्ये कुठलेही पॉजिझिव्ह किंवा निगेटिव्ह बदल आढळून आलेले नाही तो आहे तसाच आहे. त्यामुळे व्हायरस तास तो लगेच नष्ट होणार नाही. त्याची तीव्रता मात्र कमी होईल. ज्या पद्धतीने गेली अनेक वर्षे  एच 1 एन 1 व्हायरस आपल्यासोबत आहे. त्याप्रमाणे हा व्हायरस आपल्यासोबत असणार आहे, तो किती वर्ष असेल हे आताच  सांगणे मुश्किल आहे. तसेच राज्यात रुग्णसंख्या कमी झाली म्हणजे सर्व आलबेल आहे असे नागरिकांनी मानण्याचे मुळीच कारण नाही. कोरोनाचे वर्तन कधी बदलेल काही सांगता येत नाही. राज्य सरकारबरोबर नुकतीच  बैठक झाली, त्यामध्ये जर दुसरी लाट आली तर आपल्याला कशा पद्धतीने तयारी ठेवावी लागणार आहे याबाबत सूचना केल्या आहेत. कोणती कोरोनाची रुग्णालये  ठेवायची आहेत, कुणाला त्यातून मुक्त करायचे आहे, साधनसामुग्री कशा पद्धतीने सज्ज ठेवायची आहे  याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्या दृष्टीने सरकार संपूर्ण तयारीनिशी सज्ज आहे."


व्हायरस नष्ट होण्यापेक्षा कसे दूर राहू याचा विचार गरजेचा


वैद्यकीय तज्ञांच्या मते, व्हायरस नष्ट होण्यापेक्षा त्यापासून कसे दूर राहू याचा नागरिकांनी विचार केला पाहिजे. रोज सॅनिटायझर किंवा साबणाने हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, नाका-तोंडावर मास्क व्यवस्थितपणे लावणे  हे सुरक्षिततेचे नियम पाळले पाहिजे. तसेच आजाराची कुठलीही लक्षणे दिसली तर तात्काळ डॉक्टराचा सल्ला घेतला पाहिजे. आरोग्याच्या बाबतीत कुणीही बेफिकिरी बाळगता कामा नये.


व्हायरस इतक्यात नष्ट होणार नाही हेही तितकेच सत्य


राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे सांगतात की, " पहिली गोष्ट हा व्हायरस  संपूर्ण जगासाठी नवीन आहे. अनेक देशामध्ये याच्या बाबत अभ्यास सुरु आहे. आपल्या देशात या पूर्वी अनेक व्हायरस आले होते, त्यापैकी सध्याचे उद्धरण म्हणजे स्वाईन फ्लू 11-12वर्षांपूर्वी या आजराने थैमान घातले होते. आता मात्र काही प्रमाणात दरवर्षी एका विशिष्ट काळात पावसाच्या दरम्यान हा आजार येतो आणि जातो. तसेच पोलिओ आणि देवीच्या आजाराचे  व्हायरस समूळ नष्ट करण्यात आपल्या देशाला यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या आजाराविरोधात जो पर्यंत लस येत नाही तोपर्यंत लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. त्याशिवाय कालांतराने या व्हायरसमध्ये जनुकीय बदल होत असतात. त्यानंतर ह्या व्हायरसचे रूपांतर जे आता महामारीमध्ये आहे त्याचे रूपांतर नियमित स्वरूपाच्या आजारामध्ये होते. वर्षाच्या एका विशिष्ट काळात येणे, हळू-हळू या आजाराची प्रकरणे कमी होतात. मात्र व्हायरस नष्ट इतक्यात होणार नाही हेही तितकेच सत्य आहे."