मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू करण्यास आता राज्य सरकारने एक प्रस्ताव मध्य आणि पश्चिम रेल्वेला पाठवला होता. राज्यसरकारने पाठवलेल्या प्रस्तावाला पश्चिम आणि मध्य रेल्वेने उत्तर दिले आहे. या प्रस्तावावर विचार विनिमय करून रेल्वेकडे त्यांचे मत राज्य सरकारने मागितले होते.


पश्चिम आणि मध्य रेल्वेनं म्हटलं आहे की, कोरोनाच्या आधी प्रत्येक दिवसाला 35 लाख प्रवासी हे पश्चिम रेल्वेवर प्रवास करायचे, मात्र आता एका लोकलमध्ये सातशे प्रवाशी यानुसार दिवसाला 9.6 लाख प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे सर्वांसाठी लोकल सुरू करायचे असल्यास आधी तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दीचे विभाजन करण्यासाठी एखादा उपाय शोधावा, ज्याप्रमाणे पश्चिम बंगाल राज्यसरकारने शोधला आहे त्याप्रमाणे, महाराष्ट्र सरकार देखील विचार करत आहे असे आधी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले होते. या तांत्रिक रुपयासाठी जी मदत लागेल ती करण्यास रेल्वे तयार आहे, असं पश्चिम रेल्वेनं म्हटलं आहे.


मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु व्हावी यासाठी राज्य सरकारचं रेल्वेला पत्र


पश्चिम आणि मध्य रेल्वेनं म्हटलं आहे की, सरकारने प्रत्येक तासाला एक लेडीज स्पेशल चालवण्याचे सांगितले आहे, मात्र आधीपासून सर्व लेडीज स्पेशल लोकल सुरू आहेत तसेच प्रत्येक लोकलमध्ये 23 टक्के जागा या लेडीज प्रवाशांसाठी राखीव आहेत. त्यामुळे प्रत्येक तासाला लेडीज स्पेशल चालवल्यास स्टेशनवर महिला प्रवासी वाट बघत उभे राहतील तसेच पुरुष प्रवाशांसाठी लोकलच्या फेऱ्या कमी होतील यामुळे स्थानकावर गर्दी वाढेल, असं पश्चिम आणि मध्य रेल्वेनं म्हटलं आहे.


सध्या यु टी एस ॲप द्वारे रेल्वेचे तिकीट बुक करणे बंद ठेवण्यात आले आहे, मात्र सर्वांसाठी लोकल सुरू केल्यास तिकीट काउंटर सोबतच या ॲपवरून तिकीट बुकिंग सुरू करावी लागेल, मात्र त्यात देखील कॅटेगरीनुसार टिकीट देण्याचे तंत्रज्ञान असल्याने सरकारला त्याबाबत विचार करावा लागेल, असं  पश्चिम आणि मध्य रेल्वेनं म्हटलं आहे. आता सुरू असलेल्या 704 लोकल सर्विसच्या बदल्यात पश्चिम रेल्वे आधी प्रमाणे पूर्ण क्षमतेने, 1367 लोकल फेऱ्या चालू शकेल मात्र, सरकारने जी आर पी आणि आर पी एफ यांच्यासोबत काम करण्यासाठी राज्य सरकारच्या पोलीस यंत्रणेची मदत घेणे आवश्यक ठरणार आहे. या संदर्भात लवकरात लवकर सर्व प्रशासनाची बैठक होणे अत्यंत गरजेचे आहे.