GST on Food Items and Restaurants : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या GST परिषदेच्या दोनदिवसीय बैठकीत सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामुळे महागाईने पिचलेल्या सामान्यांवर आणखी कराचा बोजा पडणार आहे. विविध कर लादून सर्वसामान्यांच्या खिशावर बोजा वाढवला असतानाच काही क्षेत्रांना मोठा दिलासाही देण्यात आला आहे. मात्र, राज्यांना नुकसान भरपाई आणि ऑनलाइन गेमिंगसारख्या मुद्द्यांवर कोणताही निर्णय होऊ शकला नाही.


जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत ज्या वस्तूंचे दर वाढवण्यात आले आहेत. त्यामध्ये प्री-पॅक केलेले आणि लेबल केलेले पीठ आणि तांदूळ समाविष्ट आहेत. जरी ते ब्रँडेड नसले तरी त्यांच्यावर 5 टक्के दराने कर आकारला जाईल. याशिवाय मांस, मासे, दही, चीज आणि मध यांसारख्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांवरही समान दराने कर आकारला जाईल म्हणजेच हे सर्व खाद्यपदार्थ आता महाग होणार आहेत. याशिवाय गूळ, विदेशी भाज्या, न भाजलेले कॉफी बीन, प्रक्रिया न केलेला हिरवा चहा, गव्हाचा कोंडा आणि तांदळाचा कोंडा यांनाही सूटमधून बाहेर ठेवण्यात आले आहे. नवीन दर 18 जुलै 2022 पासून लागू होतील. 


दरम्यान, तेजीमंदी संस्थापक वैभव अग्रवाल यांनी या निर्णयाने काय स्वस्त होईल आणि काय महाग होईल याबाबत अधिक स्पष्टता करून माहिती दिली आहे. 


जीएसटी दरात सुधार झाल्यानंतर खालील वस्तू महाग होतील


बँक चेक बुक


चेक जारी करण्यासाठी बँकांकडून आकारलेल्या शुल्कावर 18 टक्के जीएसटी आकारला जाईल.


पॅक केलेले अन्न


दही, लस्सी, पनीर, मध, सुकामखना, गहू आणि मांस (गोठवलेले वगळता) यांसारख्या सर्व प्रकारचे प्री-पॅक केलेले खाद्यपदार्थ्यांवर पूर्वी सूट देण्यात आले होते परंतु, आता त्यांच्यावर 5% जीएसटी लागू होईल.


हॉटेल रुम्स आणि हॉस्पिटल बेड्स


रु. 1,000 प्रति दिवसापेक्षा कमी दराच्या हॉटेल रूम्सवर 12 टक्के जीएसटी लागू होईल.


रू. 5000 प्रति दिवसपेक्षा अधिक दर असलेल्या रूग्णालयातील खाटांवर 5 टक्के कर आकारला जाईल (आयसीयू वगळून)


LED लाईट्स, लॅम्प्स, चाकू


LED लाईट्स आणि लॅम्प्स यांच्यावरील कर 12% वरून 18% करण्यात आला आहे. तसेच कटिंग ब्लेड, पेपर चाकू आणि पेन्सिल शार्पनरवर 18 टक्के करआकारला जाईल.


पंप्स आणि मशीन्स


सायकल पंप, टर्बाइन पंप आणि सबमर्सिबल पंपांवर आता 18 टक्के टॅक्स आकारला जाईल. तसेच बियाणे साफ करण्यासाठी आणि वर्गीकरण करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मशीनवर 18 टक्के कर आकारला जाईल. सोलर वॉटर हीटर्सवरही 12 टक्के GST आकारला जाईल, जोपूर्वी 5% होता.


जीएसटी दरात सुधार झाल्यानंतर या वस्तू स्वस्त होतील


वस्तूंचे वाहक भाडे


वस्तू शिफ्ट करणे आता स्वस्त होईल. कारण, जीएसटी परिषदेने वाहक वाहनांवरील कर 18 टक्क्यांवरु 12 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे, ज्यात इंधन खर्चाचा समावेश आहे.


रोपवे राइड्स


रोपवे राइड्सवरील कर देखील 18 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.


ऑर्थोपेडिक उपकरणे


ऑस्टोमी आणि ऑर्थोपेडिक उपकरणांवर आता 5 टक्के कर आकारला जाईल, जोपूर्वी 12 टक्के होता.


पुढे काय होऊ शकते?


शिफारस केलेले जीएसटी बदल 18 जुलै 2022 पासून लागू होतील. जीएसटी परिषदेने कॅसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के कर आकारण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. परिषदेने मंत्रिगटाला (GoM) 15 जुलै 2022 पर्यंत राज्यांकडून त्यांचे इनपुट सादर करण्यास सांगितले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या