मुंबई : नुकताच सोशल मीडियावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा शिवाजी पार्क येथील टेनिस खेळतानाचा फोटो व्हायरल झाला. त्यानंतर माध्यमांत राज ठाकरे यांच्या निरोगी आरोग्यासाठी ते करत असलेल्या उपायांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. याबाबत एबीपी माझाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून राज ठाकरे दररोज संध्याकाळी शिवाजी पार्क येथील जिमखान्यात टेनिस खेळायला जातात. त्यावेळी त्यांच्यासोबत टेनिस खेळण्यासाठी त्यांनी आदित्य नावाच्या एका कोचची देखील नियुक्ती केल्याची माहिती आहे.


दररोज संध्याकाळी शिवजीपार्क येथील जिमखाना येथे तास दोन तास टेनिस खेळणे, पहाटे साडे पाच वाजता लवकर उठून एक तास योगासने करणे. त्यानंतर बॉडी स्ट्रेचिंग करणे असे उपाय दररोज राज ठाकरे करत असल्याची माहिती आहे. यासोबतच वजन कमी करण्यासाठी त्यांनी संकेत कुलकर्णी नावाच्या एका प्रशिक्षकाची देखील नेमणूक केली असून संकेत हे राज ठाकरे यांना वजन कमी करण्यासाठीचा डायट कसा असावा याबाबत मार्गदर्शन करत आहेत. यासाठी त्यांनी आठवड्यातील काही वार देखील ठरवून घेतले आहेत.


मंत्रिमंडळात चर्चा होऊनही डबेवाल्यांना मदत नाही, राज ठाकरेंची घेतली भेट


मागील जवळपास एक वर्षांपासून राज ठाकरे यांनी टेनिस खेळणं सुरू केलं आहे. याचा चांगलाच फायदा राज ठाकरे यांना होतं असल्याची देखील माहिती आहे. यासोबतच राज ठाकरेंनी घरीच जीम तयार केली असून दररोज व्यायाम करून घेण्यासाठी एका ट्रेनरची देखील नेमणूक केली आहे. दररोज सकाळी योगासने करणे, जीम मध्ये व्यायाम करणे, संध्याकाळी टेनिस खेळणे यासोबतच ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्या वेळी ते पोहण्याचा देखील आनंद घेतं असतात. असे उपाय राज ठाकरे यांनी सुरू केले आहेत. एकंदरीत मागील दोन वर्षात आपल्या आरोग्याबाबत राज ठाकरे खूपच सजग झाले असून निरोगी आरोग्यासाठी विविध उपाय करत आहेत. यासोबतच आणखी एक माहिती अशीही समोर आली आहे की, राज ठाकरे यांना क्रिकेट हा खेळ प्रचंड आवडतो.



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख पदाची जबाबदारी घेण्याआधी राज ठाकरे नेहमी आपल्या शिवाजी पार्क येथील घरासमोर गल्लीत क्रिकेट खेळत होते. परंतु, पक्षाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर त्यांचं क्रिकेट खेळणं पूर्णपणे बंद झालं आहे. परंतु, मागील एक वर्षांपासून त्यांनी टेनिस खेळायला सुरुवात केलीय. मध्यंतरीच्या कालावधीत राज ठाकरे सकाळी गर्दी कमी असताना शिवजीपार्क ते माहीम सिटीलाईट जवळ असणाऱ्या रेगीस जीम पर्यंत सायकलिंग देखील नियमीत करत होते. त्यानंतर जीममध्ये व्यायाम करायचे. परंतु नंतरच्या काळात गर्दीचा त्रास होऊ लागल्यामुळे राज ठाकरे यांनी घरी जीम करणे, संध्याकाळी टेनिस खेळणे आणि पहाटे साडेपाच ते साडेसहा एक तास योगासने करणे यावर भर दिला आहे. एकंदरीत राज ठाकरेंच्या या नित्यनियमांचा चांगलाच फायदा त्यांना झाला असल्याचं समोर आलं आहे.


Raj Thackeray | विविध मागण्यासंदर्भात पेणमधील मूर्तीकार संघटनांचे पदाधिकारी राज ठाकरे यांच्या भेटीला