मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता राज्यांतर्गत पाच विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलेला आहेत. या गाड्या मुंबईहुन सुटून पुणे, नागपूर, गोंदिया आणि सोलापूर या शहरांच्या दरम्यान दररोज चालवण्यात येणार आहेत. नऊ ऑक्टोबरपासून या गाड्या नियमित धावतील.


लॉकडाऊन सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील विविध शहरांना आणि जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वे बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, अनलॉक 5 च्या आदेशामध्ये राज्यांतर्गत रेल्वे वाहतूक तात्काळ सुरू करावी, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले होते. हे आदेश मिळाल्यानंतर मध्य रेल्वेने राज्यांतर्गत रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार केले. हे प्रस्तााव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आले. रेल्वे बोर्डाने गृह मंत्रालयाशी सल्लामसलत करून पाच एक्सप्रेस चालवण्यासाठी मंजुरी दिली आहे. या एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकातून दररोज सोडण्यात येतील.


प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी वाहक आणि चालक कलाकारांच्या भूमिकेत


या 5 एक्सप्रेसमध्ये दोन एक्सप्रेस या मुंबई आणि पुणे या महत्त्वाच्या शहरांमध्ये धावणाऱ्या आहेत. यातील 02123/02124 ही एक्सप्रेस डेक्कन क्वीन एक्स्प्रेस प्रमाणेच त्याच वेळापत्रकानुसार मुंबई ते पुणे दरम्यान धावेल. तसेच 02015/02016 ही इंद्रायणी एक्सप्रेसच्या वेळापत्रकानुसार दररोज मुंबई ते पुणे दरम्यान धावेल. अश्या दोन एक्सप्रेस मुंबई पुणे या दरम्यान चालवण्यात येणार आहेत. तिसरी एक्सप्रेस 02189 असून ती मुंबई ते नागपूर दरम्यान चालवली जाणार आहे. ही एक्सप्रेस मुंबई-नागपूर दुरंतो एक्सप्रेसच्या वेळापत्रकानुसार चालवली जाईल. मुंबई आणि गोंदिया दरम्यान 02105 ही एक्सप्रेस चालवली जाईल. जी विदर्भ एक्सप्रेसच्या धर्तीवर त्याच वेळापत्रकात चालवण्यात येईल. तसेच मुंबई आणि सोलापूर या शहरांदरम्यान 02115/02116 ही एक्सप्रेस सिद्धेश्वर एक्सप्रेस नुसार चालवण्यात येणार आहे.


या सर्व गाड्यांचे आरक्षण आठ तारखेपासून सुरु होणार असून तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाइन उपलब्ध असेल. या गाड्या चालवताना काही स्थानके वगळण्यात देखील आली आहेत. केवळ महत्त्वाच्या स्थानकांवर या एक्सप्रेस गाड्या थांबतील अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. तसेच ज्यांच्याकडे आरक्षित तिकीट असेल त्यांनाच प्रवासाची मुभा आहे, अनारक्षित तिकीट घेऊन प्रवास करता येणार नाही. हा प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग पाळावे आणि स्वतःसोबत इतर प्रवाशांची देखील काळजी घ्यावी असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.


सगळं रुळावर आलं, लोकल कधी येणार? लोकलबाबत केंद्र आणि राज्यात समन्वय नाही? स्पेशल रिपोर्ट