मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. भेटीत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन डबेवाल्यांनी राज ठाकरेंना दिले. राज ठाकरेंनी याबाबत लवकरच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा करू आणि विषय मार्गी लावू असं आश्वासन दिलं असल्याचं डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी माहिती दिली.


याबाबत अधिक माहिती देताना सुभाष तळेकर म्हणाले की राज्यात टाळेबंदी जाहीर होऊन आता 6 महिने उलटत आले आहे. मागील सहा महिन्यांत डबेवाल्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. टाळेबंदी जाहीर झाल्यामुळे अनेक डबेवाले आपल्या गावी निघून गेले आहेत. सध्या डबेवाल्यांना आपलं कुटुंब चालवणं मुश्किल झालं आहे. आता ग्रामीण भागात देखील कोरोना मोठ्या प्रमाणात पसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा डबेवाले मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या अनेक छोटीमोठी कामे करून डबेवाले आपलं कुटुंब चालवत आहेत. त्यामुळे आता शासनाने ज्या पद्धतीने असंघटित कामगारांना मागे 2 हजार रुपये आणि ऑगस्ट महिन्यांत 3 हजार रुपये दिले. त्यांना एकूण 5 हजार रुपये आर्थिक मदत केलेली आहे.


सध्या राज्यात असणारा असंघटित कामगार हा बहुतांशी परप्रांतीय आहे. तरीदेखील महाविकास आघाडीने त्यांना 5 हजार रुपये मदत केली आहे. आम्ही त्याच स्वागत करतो परंतु मुंबईत राहणारे डबेवाले हे भूमिपुत्र आहेत. त्यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांच्या खात्यावर 5 हजार रुपये जमा करण्यात यावेत अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. विशेष म्हणजे यावर मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा देखील झाली. परंतु अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे अजूनपर्यंत कसलाही लाभ डबेवाल्यांना मिळालेला नाही. यासोबतच सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा या डबेवाल्यांना त्यांच्या शाळांमध्ये येण्यास परवानगी देतं नाहीत.


त्यांचं म्हणणं आहे की डबेवाल्यांमुळे शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. हे त्यांचं म्हणणं आम्हाला पटलेलं नाही. याबाबत देखील आम्ही राज ठाकरेंसोबत चर्चा केली आहे. राज ठाकरेंनी आपण लावकरच या सर्व प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू असं आश्वासन दिलं आहे. जर लवकरच मुंबईत जाण्यासाठी डबेवाल्यांना लोकलने जाण्यास परवानगी मिळाली तर आम्हाला इतर व्यवसाय करून आमचं पोट भरता येईल, असं तळेकर यांनी सांगितलं.