मुंबई : पश्चिम लोकल रेल्वेने प्रवास करताना बुधवारी मध्यरात्रीपासून दादर आणि लोअरपरळ स्टेशन सोडल्यानंतर ‘पुढील स्टेशन प्रभादेवी’ अशी सूचना तुमच्या कानावर पडली तर गोंधळून जाऊ नका. कारण, एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचं नाव आता प्रभादेवी असं करण्यात आलं आहे.


एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी करण्यासाठी बरेच वर्ष प्रयत्न करण्यात येत होते. अखेर मागील अधिवेशनात केंद्र सरकारने यासाठी हिरवा कंदील दिला. त्यामुळे एलफिन्स्टन स्थानकाचं नाव बदलून बुधवारपासून प्रभादेवी केलं जाणार आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकाचं ब्रिटीशकालीन नाव काळाच्या ओघात अखेर इतिहास जमा होणार आहे.

प्रभादेवी मूळचं मंदिर हे 12 व्या शतकातलं आहे. माहिमच्या बिंबराजाने हे मंदिर बांधलं होतं. पुनर्बांधणी झालेल्या मंदिराचा नुकताच 302 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या प्रभादेवीच्या नावावरुनच सभोवतालचा परिसर हा प्रभादेवी म्हणून ओळखला जातो.

या नावानेच आता पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी स्थानक म्हणून ओळखलं जाणार आहे.

इंग्रजांच्या काळापासून या स्टेशनचं नाव एलफिन्स्टन होतं. बऱ्याच वर्षांपासून शिवसेनेकडून एलफिन्स्टन स्टेशनचं नामांतरण करण्याची मागणी होत होती. रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून एलफिन्स्टन स्टेशनचं नावं बदलून प्रभादेवी करावं अशी मागणी शिवसेनेने केली होती.

‘एल्फिन्स्टन रोड’ हे नाव लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या नावावरून देण्यात आलं होतं. ते 1853 ते 1860 या काळात ‘गव्हर्नर ऑफ बॉम्बे’ होते.