मुंबई : अँटालिया स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणी मास्टरमाईंड असल्याच्या आरोपाखाली माजी पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी शर्मा यांना याप्रकरणी 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या दोन्ही प्रकरणांत तूर्तास शर्मा यांची चौकशी पूर्ण झाल्याचं सांगत एनआयएनं त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची विनंती कोर्टाकडे केली. शर्मा यांची पोलीस कोठडी संपत असल्यानं त्यांना सोमवारी दुपारी मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
ठाणे कारागृहात पाठवण्यासाठी प्रदीप शर्मा यांच्यावतीनं एनआयए कोर्टाकडे विनंती
जेल कोठडी मिळताच आपल्याला विशिष्ट करागृहात पाठवण्यासाठी शर्मा यांच्यावतीनं एनआयए कोर्टापुढे अर्ज करण्यात आला. भायखळा येथील आर्थर रोड आणि नवी मुंबईतील तळोजा कारागृहात शर्मा यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांना ठाणे कारागृहात पाठवण्यासाठी प्रदीप शर्मा यांच्यावतीनं एनआयए कोर्टाकडे विनंती करण्यात आली. एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा यांना गेली अनेक वर्ष पोलीस संरक्षण पुरवण्यात आलं आहे, त्यामुळे या विनंतीचा विचार करावा असं या अर्जात म्हटलेलं आहे. या अर्जाचा स्वीकार करत न्यायाधीश डी.ई. कोथळीकर यांनी जेल प्रशासनाला शर्मा यांच्या अर्जाचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश जारी केले आहेत.
व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येत संतोष शेलार आणि आनंद जाधव यांचा सक्रिय सहभाग होता, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणकडनं विशेष एनआयए सत्र न्यायालयात करण्यात आला आहे. या दोघांचाही रिमांड संपत असल्यानं त्यांनाही कोर्टापुढे हजर करण्यात आलं होतं. त्यांनाही कोर्टानं 12 जुलैुर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलीय. तर या प्रकरणात अटक झालेल्या मनिष सोनी आणि सतीश मुठेकरी यांनी या घटनेनंतर परदेशवारी केल्याची माहिती आहे. त्याची अधिक माहिती मिळावी यासाठी त्यांची चौकशी करणं आवश्यक आहे. म्हणून दोघांनाही एनआयए कोठडी देण्यात यावी, अशी मागणी एनआयएकडून करण्यात आली त्यानुसार कोर्टानं त्यांना 1 जुलैपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ कार उभी करणं आणि त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या करणं. या प्रकरणात सुनील माने, संतोष शेलार आणि आनंद जाधव यांनाही शर्मा यांच्यासह अटक करण्यात आली आहे. यापैकी शेलार आणि जाधव यांच्या चौकशीदरम्यान, माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरूनच हिरेन यांची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. हत्येच्यावेळी एकाने हिरेन यांचा डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडल्याचंही त्यांनी कबूल केल्याची माहिती एनआयएच्यावतीनं न्यायालयाला देण्यात आली.