पालघर : मोबाईल नेटवर्कच्या शोधात झाडावर चढलेल्या मुलांच्या अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू, तर तीन जखमी झाली आहेत. डहाणू तालुक्यातील ओसरविरा गावात सोमवार, 28 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास झाडावर वीज पडून हा अपघात घडला.


डहाणू तालुक्यात सोमवारी दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकटाला सुरुवात झाली. तालुक्यातील ओसरविरा गावच्या मानकरपाडा येथील काही मुलं मोबाईल रेंज मिळण्यासाठी उंबराच्या झाडावर चढली होती. संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास या झाडावर वीज पडली पडल्याने रविन बच्चू कोरडा (वय 17 वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला. चेतन मोहन कोरडा (वय 11 वर्षे), दीपेश संदीप कोरडा (वय 11 वर्षे) आणि मेहुल अनिल मानकर (वय 12 वर्षे) हे जखमी आहेत. त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मेहुल  याला अधिक उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलला पाठविण्यात आले आहे.


दरम्यान ही सर्व शाळकरी मुले असून मृत झालेला रविन हा इयत्ता नववीमध्ये शिकत होता. जखमी विद्यार्थी हे सहावी ते आठवी इयत्तेत शिकणारे आहेत. या गावात मोबाईला रेंज येत नसल्याने ही मुले पाड्यापासून दीड किमी अंतरावर झाडावर चढून नेटवर्क मिळवण्याच्या प्रयत्नात होती. तर काही झाडाखाली खेळत असताना ही घटना घडली.