नवी मुंबई : कोरोना काळात सर्वसामान्या नागरिकांची आर्थिक स्थिती आधीच गडबडली आहे. अशात शाळांना पालकांकडून जबरदस्ती फी वसूल करू नका असे सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे. मात्र असं असलं तरी शाळा सरकारचा आदेश धाब्यावर बसवत आहेत. नवी मुंबईतील काही शाळांनी तर चक्क फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना वकिलांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
कोरोना मुळे पालकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कमी झाले, उद्योगधंदे बंद पडले. आर्थिक स्थिती बिकट झाल्याने रोजच्या जगण्याचा संघर्ष सुरू असताना हजारो रूपयांची फी भरायची कुठून असा प्रश्न पालकांसमोर उभा आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही एक्स्ट्रा ॲक्टिव्हीटी सोडून शाळेची ट्युशन फी फरायला पालक तयार आहेत. मात्र यानंतरही शाळा व्यवस्थापन पूर्ण फी वर अडून बसले आहे.
फी न भरल्याने 27 विद्यार्थ्यांना शाळेतून काढले, खारघरमधील विश्वज्योत शाळेतील प्रकार
धक्कादायक प्रकार म्हणजे सानपाडा येथील रायन इंटरनॅशनल स्कूल आणि वाशीतील सेंट लाॅरेन्स हायस्कूलने वकिलांकडून फी वसूलीसाठी थेट नोटीस पाठवली आहे. पूर्ण फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी शाळेने वकीलांची नोटीस पाठवत कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे. वकीलांची नोटीस पाहून पालकांना धक्का बसला आहे तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे.
नवी मुंबईतील बहुतांश शाळांनी फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲानलाईन शिक्षणातून बाहेर काढल्याने पालकांनी आता कोर्टात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे पालकांना फी साठी मानसिक त्रास देणाऱ्या 5 शाळांची मान्यता रद्द करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी शिक्षण उपसंचालकांकडे पत्रव्यवहार केला आहे.
फी कमी भरणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्याचा प्रकार
17 जून रोजी फी कमी भरणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट शाळेतून काढण्याचा प्रकार खारघर येथील विश्वज्योत शाळेने केला होता. शाळेने वाढवलेली ज्यादा फी भरण्यास नकार दिल्याने 27 विद्यार्थ्यांना थेट शाळेतूनच काढत व्यववस्थापनाने हुकूमशाही केल्याचा आरोप पालकांनी केला होता. दरम्यान शाळेविरोधात कारवाई करण्याचे संकेत पनवेल महानगर पालिका प्रशासनाने दिले होते. 27 विद्यार्थ्यांना त्यांचे शाळेचे दाखले काढून त्यांच्या मेलवर पाठवण्यात आले आहेत. फी न भरल्याने शाळेतून काढल्याचा शेरा लिव्हींग सर्टिफीकेटवर मारला आहे. या विरोधात पालकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्याबरोबर शिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.