मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठकीत महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. विशेषतः मुंबई, ठाण्यात काय उपाययोजना केल्या यावर चर्चा झाली, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील दिली. याशिवाय कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना दिलेली कमिटमेंट सरकार पाळणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकात ही बैठक झाली. या बैठकीला मंत्री जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत, राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता उपस्थित होते. त्यानंतर बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.


सरकारने मुंबईत हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. ठाण्यात सुरु निर्मिती आहे. महाराष्ट्रात काय केलं. मुंबईत काय अवस्था आहे, यावर चर्चा केली. कोविडवर लक्ष केंद्रीत करुन नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, ठाणे, मुंबई या सर्व ठिकाणी सुरु असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.


शरद पवार रेल्वेमंत्र्यांशी बोलत आहेत
जयंत पाटील म्हणाले की, "मजुरांना घरी जाण्यासाठी अधिकच्या गाड्या मिळाव्यात अशी मागणी केंद्र सरकारकडे केली, पण ट्रेन उपलब्ध होत नाहीत. लॉकडाऊन जाहीर केला त्यावेळीच मुख्यमंत्र्यांनी रेल्वेची मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा तीन वेळा लेखी मागणी केली. आम्ही ट्रेनसंदर्भात पुन्हा मागणी करत आहोत. शरद पवार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलत असल्याचं पाटील यांनी सांगितलं. तसंच मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेन मिळावी या संदर्भात निर्णय करणं आवश्यक आहे," असं पाटील म्हणाले.


शेतकऱ्यांना दिलेली कमिटमेंट पाळणार : जयंत पाटील
कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना दिलेली कमिटमेंट आम्ही पाळणार आहोत, असंही जयंत पाटील यांनी नमूद केलं. "ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकलो नाही त्यांना पुढचं कर्ज आहे. शेतकरी अडणार नाहीत. कर्जमाफीचे पैसे यथावकाश सरकार शेतकऱ्यांना देईल. शेतकऱ्यांना दिलेली कमिटमेंट आम्ही पाळणार आहोत," असं पाटील यांनी सांगितलं.