शहापूर : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून रोजच्या उदरनिर्वाहासोबतच आता पाणीटंचाईचे संकटही त्यांना भेडसावते आहे. धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर व कसारा भागातील जनतेचं घसा मात्र अजूनही कोरडाच आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यात भातसा ,तानसा,वैतरणा, मोडकसागर सारख्या महाकाय जलाशयांच्या जलसंपत्तींचा ठेवा उशाशी असतानाही येथील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

तालुक्यातील शहापूर , कसारा माळ, विहिगाव, ढेंगणमाळ, सुसरवाडी, वशाळा, साठगाव, आपटे गावासह 220 गाव पाड्यांवर भीषण पाणी टंचाई आहे. विहिरी कोरड्या ठाक पडलेल्या आहेत. काही विहिरींमध्ये दगडाच्या फटीतून थेंब थेंब पाणी विहिरीत जमा होते आणि एक हंडा पाणी साचायला जवळपास एक ते दोन तास लागतात. विहिरीतील पाणी खोल भागात असल्याने जीव धोक्यात घालून फक्त एक हंडा पाण्याकरता महिला व पुरुष विहिरीमध्ये उतरतात. तसेच काही ठिकाणी विहिरीच्या कठड्यावर उभे राहून दोरीच्या मदतीने खेचून पाणी काढलं जातं. त्यामुळे अनेकदा अपघातही घडले आहेत.

शहापूर तालुक्यात जानेवारी महिन्यापासूनच पाण्याची टंचाई भासू लागल्याने तालुक्यातील 220 गाव पाड्यांवर फक्त 35 टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे काही गाव पाड्यांना 2 ते3 दिवसाआड टॅंकरने पाणी मिळते.  तर काही गाव पाड्यांना टँकरचे पाणी देखील मिळत नाही. त्यामुळे पाणी आणण्यासाठी येथील महिला 3 ते 4 किलोमीटर जीव धोक्यात घालून डोंगराळ भागातून खाली उतरतात. तसेच रेल्वे रूळ व महामार्गावरून पायपीट करतात.

एक हंडा पाण्यासाठी रात्रभर येथील महिला रांगा लावून बसलेल्या असतात. दगडाच्या फटीतून झऱ्याप्रमाणे थेंब-थेंब पाणी साचल्यावर ते पाणी वाटीने भरले जाते. विशेष म्हणजे या भागात चार मोठी धरणं आहेत. पाणी डोळ्याने दिसतंय पण प्यायला मिळत नाही. धरण उशाला अन् कोरड घसाला अशी अवस्था या गावकऱ्यांची झाली आहे. नेतेमंडळींचे अनेक दौरे या भागात होत असतात. अनेक आश्वासने दिली जातात. परंतु ही आश्वासने पूर्ण मात्र कधी झाली नाहीत, अशी गावकऱ्यांची भावना आहे. एवढा भीषण दुष्काळ पाहूनही प्रशासन वर्षानुवर्ष झोपेचं सोंग का घेत आहे? असा सवाल गावकरी करत आहेत.