विरार : नाशिकाला देवदर्शानासाठी जातो, असं सांगून शर्मा कुटुंबीय गाडीत बसून घरातून बाहेर पडलं, पण परतलंच नाही. विरारच्या ग्लोबल सिटीमधून पहाटे साडेतीन वाजता निघालेले शर्मा कुटुंब सीसीटीव्हीत अखेरचं कैद झालं, पण पुढे त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.


शर्मा कुटुंबियांची सून संगीता शर्मांनी अमरावतीतून ईमेलद्वारे कुटुंबीय बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. 15 दिवसांपासून सासरचे सहा जण बेपत्ता असल्याचं त्या सांगतात.

विरारच्या ग्लोबल सिटी, एव्हेन्यू जे या सोसायटीमध्ये शर्मा कुटुंबीय राहायचे. सून संगीता शर्मा बाळंतपणासाठी अमरावतीमध्ये होत्या. 15 जूनला त्यांना मुलगी झाली. तर 11 ऑक्टोबरला पती वरुण शर्मा त्यांना भेटायलाही गेले होते.

विरार पश्चिमेला वरुण शर्मा, त्यांची पत्नी संगीता शर्मा, दीर अश्विनी शर्मा आणि संगीताची सासू अनिता शर्मा राहतात.  तर विरार पूर्वेला रश्मी गार्डन येथे संगीताच्या पतीचे काका सतीशचंद्र शर्मा, त्यांची पत्नी आणि मुलगी प्रियंका हे सर्वजण राहतात.

शर्मा कुटुंबातील सर्व जण उच्चशिक्षित आहेत. वरुण आणि अश्विनी ग्राफिक डिझायनर म्हणून काम करायचे, तर काका नामांकित कंपनीसाठी आणि घराच्या विक्रीसाठी एजंट म्हणून काम करायचे.

संगीता शर्माच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शर्मा कुटुंबियांचा शोध सुरु केला. शर्मा कुटुंबीय सुरतला गेले का? आपल्या सुनेला एकटी टाकून ते फरार झाले का? आणि आता शर्मा कुटुंबीय कुठे आहेत, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.