मुंबई : मनसेला भाजप रसद पुरवते, हे आरोप बिनबुडाचे आहेत. हे आरोप आमच्यावर विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतानाही झाले. सरकार त्यांचं काम करेल, आम्ही आमचं काम करु, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.


“हायकोर्टाने आधीच 150 मीटरच्या आत फेरीवाल्यांना मनाई केलेली आहे. आम्हाला लाठ्या-काठ्या घेऊन मुलं पाठवण्याची हौस नाही. पण अनाधिकृत फेरीवाल्यांना किती काळ आम्ही सहन करायचा, म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं.”, असे नांदगावकर म्हणाले.

“यापुढे रेल्वे, पोलीस आणि बीएमसीने फेरीवाल्यांवर कारवाई केली नाही, तर त्यांच्या विरोधात आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करु, असा इशाराही बाळा नांदगावकरांनी दिला.

राज ठाकरे-मुख्यमंत्री भेटीबद्दल बाळा नांदगावकर म्हणाले, “आजची भेट कल्याण-डोंबिवलीतील जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवर विकास करताना अडचणी निर्माण होत आहेत, त्यासंदर्भात होती. वर्षानुवर्षे तिथे राहणाऱ्या स्थानिकांना पुनवर्सन करण्यास अडचण होते. स्टार्टअप इको पॉलिसीमध्ये तरुणांना अडचणी येत आहेत. इतर राज्यांनी स्वत:ची पॉलिसी बनवलीय, मात्र आपल्या राज्यात अद्याप पॉलिसी नाही. याबाबत राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली.”