Virar News Updates: सामान्य लोकांची फसवणूक होवू नये आणि अनधिकृत बांधकामाला चाप लावण्यासाठी आपल्या पती विरोधात उभ्या राहिलेल्या पत्नीच्या तक्रारीवरुन अखेर अनधिकृत बांधकामावर आज पालिकेने तोडक कारवाई केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जागेवर ही इमारत उभारली जात होती. वसई विरारमध्ये भूमाफिया आणि चाळ माफियांनी हैदोस घातला आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चाळमाफियांनी अनधिकृत बांधकामाच साम्राज्य उभं केलं आहे. 


विरारच्या फुलपाडा येथे सर्व्हे क्रमांक 86 हिस्सा नंबर 3 या महाराष्ट्र शासनाच्या जागेवर चाळमाफिया बिनधास्तपणे अनधिकृत इमारत उभारुन ते सामान्य लोकांना विकत होता. बिल्डर येथे चार मजली इमारत बांधत होता. इमारत बांधताना ना चाळीला रस्ता ना मोकळी जागा. एखादी घटना घडल्यास पालिकेची अग्निशमन यंत्रणा किंवा अॅम्ब्युलन्सही त्या चाळीपर्यंत पोहोचू शकत नव्हती. बिल्डराने काही रुमच्या रजिस्टरी नोंद करुन विक्री ही केली होती. पत्नी रीमा म्हात्रे हिने या इमारतीत गोर गरीब जनतेची फसवणूक होईल. हे ओळखून तिने या अन्यायाविरोधात आपला पती किरण म्हात्रे विरोधातच दंड थोपटलं.  


पालिका प्रशासनाकडून शनिवारपासून इमारत तोडण्याचं काम सुरु


2019 पासून पालिकेच्या दप्तरी तिने अनधिकृत बांधकामाविषयी लेखी तक्रारी केल्या, तरी पालिकेला जाग येत नव्हती. शेवटी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यानंतर जागी झालेल्या महसूल आणि पालिका प्रशासनाने शनिवारपासून इमारत तोडण्याचं काम सुरु केलं आहे. या चाळीवर चाळ बिल्डाराने सामान्य नागरीकांकडून लाखो रुपये उचळले आहेत. काहींना तर रुम रजिस्टर करुन ही विकल्या आहेत. सध्या चाळ बिल्डर फरार झाला आहे. पालिकेने चाळ बिल्डरवर एम.आर.टी.पी. ही लावली आहे. 


महाराष्ट्र शासनाची जागी सातबाऱ्यावर असूनही रजिस्टर करुन काही रुम बिल्डराने विकल्या


विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाची जागी सातबाऱ्यावर असूनही, रजिस्टर करुन काही रुम बिल्डराने विकल्या आहेत. रजिस्टर करणारे अधिकारी रुम नोंदणी करताना साधं सातबाराही बघत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच या भ्रष्टाचाराची पालमुळं किती खोलवर रुतली आहेत हे यावरुन कळून येतं. दरम्यान या कारवाईची चर्चा संपूर्ण विरार परिसरात होत आहे.


आणखी चार इमारतीवरही बुलडोझर फिरवण्यात येणार


शासकीय जागेवर बांधण्यात आलेल्या आणखी चार इमारतीवरही बुलडोझर फिरवण्यात येणार असून, पालिका हद्दीत अनधिकृत बांधकामावर पालिका आता तोडक कारवाई तीव्र करणार असल्याची माहिती वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली आहे.