विरार: लाडकी लेक एका वर्षाची झाली. तिचा वाढदिवस जोरात साजरा करू अशी स्वप्न त्या चिमुकलीच्या आई- वडिलांनी पाहिली असतील, त्यासाठी मोठी तयारी केली, वाढदिवसाचा तो दिवस उजाडला. संध्याकाळी सगळी तयारी झाली, वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू होतं, जवळचे मित्र मंडळी आणि नातेवाईक यांनी घर गजबजल होतं. कुठे कोणाच्या गप्पा सुरू होत्या तर कुठे त्या चिमुकलीचं कौडकौतुक सुरू होतं. हा आनंदाचा क्षण एका दुर्दैवी घटनेत बदलेल अशी कोणी कल्पना देखील केली नसावी. क्षणार्धात चार मजली इमारत कोसळली आणि या दुर्घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अद्याप 20 ते 25 लोक मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्दैवी घटनेत ज्या चिमुकलीचा पहिला वाढदिवस होता, ती देखील गेली, तिच्यासोबत तिच्या आईचा देखील मृत्यू झाला, तर वडील इमारतीच्या मलब्याखाली अडकले गेले, या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बागडणारी ती चिमुकली आता शांत, निपचीत पडलेली
घटनेची माहिती मिळताच एन.डी.आर.एफ पथक आणि वसई विरार शहर महापालिकेची अग्निशमन दलाची टिम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी मलब्याखालून त्या चिमुकलीला काढण्यात आलं, बचावकार्य करणाऱ्या एका जवानाच्या हातात त्या चिमुकलीचा मृतदेह होता, ते चित्र पाहून सर्वजण भावूक झाले, ते दृश्य पाहून सर्वांनी हळहळ व्यक्त केली आहे. काही वेळापूर्वी हसणारी, रडणारी, बागडणारी ती चिमुकली आता शांत, निपचीत पडलेली होती, हे दृश्य मन हेलावणारे होते.
भिंतींमध्ये भेगा पडल्या होत्या
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक इमारतीचा एक भाग कोसळला आणि मोठा मलबा खाली आला. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (NDRF) तसेच स्थानिक प्रशासनाचे बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत काही जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांना जवळच्या VVMC रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही इमारत जुन्या बांधकामाची असल्याने काही दिवसांपासून तिच्या भिंतींमध्ये भेगा पडल्या होत्या, अशी माहिती स्थानिकांनी दिली. सलग पावसामुळे भेगा अधिक रुंद झाल्या आणि त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सध्या मलबा हटवून लोकांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या अपार्टमेंटमध्ये सुमारे 12 कुटुंबे वास्तव्यास होती. दुर्घटना घडल्यानंतर इमारतीच्या दुसऱ्या विंगला तातडीने रिकामे करून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी इमारतीला सील केले असून पुढील धोका टाळण्यासाठी परिसरातील नागरिकांना सावध करण्यात आले आहे.
बचाव पथकाला मलब्याखालून आवाज ऐकू येतायत
स्थानिक नागरिकांच्या मते, इमारतीच्या देखभालीकडे वारंवार दुर्लक्ष केले गेले होते. वारंवार सूचना करूनही दुरुस्तीचे काम करण्यात आले नव्हते. त्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, बचाव पथकाला मलब्याखालून आवाज ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अजून किती लोक जिवंत आहेत याचा शोध घेतला जात आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका अधिकारी, तसेच प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
प्रशासनाकडून जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संजीवनी हॉस्पिटल : जखमी
1.संजय स्वपन सिंग
2.मिताली राजेश परमार
यांना मुंबईच्या खार रोड येथील रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे.
प्रकृती हॉस्पिटल बोलिंज : जखमी
1.प्रदीप कदम
2.जयश्री कदम
3.विशाखा जोयेल.
4.मंथन शिंदे
5. आरोही ओंकार जोयल (वय 24 ) - ही मयत झाली आहे.
सिद्धिविनायक हॉस्पिटल नालासोपारा : जखमी
प्रभाकर शिंदे
प्रमिला प्रभाकर शिंदे
प्रेरणा प्रभाकर शिंदे
जीवदानी हॉस्पिटल चंदनसर
उत्कर्षां ओंकार जोयल (वय 1 वर्ष) ही मयत झाली आहे.