Manoj Jarange Maratha Morcha: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी जालन्यातली अंतरवाली सराटी येथून मराठा मोर्चा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. आज सकाळी 10 वाजता मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे मराठा आंदोलकांसह अंतरवाली सराटीहून (Antarwali Sarati) निघतील. यानंतर त्यांचा आजचा मुक्काम जुन्नरमध्ये असेल. त्यानंतर राजगुरु नगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूर असा प्रवास करत हा मराठा मोर्चा 28 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात पोहोचणार होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला. पुढील दोन आठवड्यांसाठी पूर्वपरवानगीशिवाय कोणालाही आंदोलन करता येणार नाही, असे निर्देश उच्च न्यायालयाने (Bombay HC) दिले आहेत.

त्यामुळे मनोज जरांगे यांची कोंडी झाल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आज वकील विनोद पोखरकर यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे. परंतु, न्यायालय आम्हाला आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देईल. त्यामुळे कोर्टात जाणार नाही, असेही विनोद पोखरकर यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मनोज जरांगे गुरुवारी संध्याकाळी मुंबईत पोहोचेपर्यंत उच्च न्यायालय आणखी काही निर्देश देणार का, हे पाहावे लागेल. दरम्यानच्या काळात महायुती सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्नही होऊ शकतात. 

दरम्यान, आंतरवाली सराटी येथे मराठा समाज मोठ्या संख्येने दाखल होत असून मोर्चाची जय्यत तयारी झाली आहे. राज्यात एकीकडे गणेश उत्सवाची धूम असून  दुसरीकडे जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाचा एल्गार सुरू आहे. मनोज जरांगे हे मुंबई आंदोलनासाठी ठाम असून मराठा आंदोलक अंतरवाली सराटी मध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. मसाजोग ग्रामस्थांसह दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीकडे निघाले आहेत. आजच्या आरक्षणाच्या लढ्यात भाऊ संतोष देशमुख यांची उणीव जाणवत आहे. गरजवंत मराठ्यांच्या लढ्यात त्यांचा देखील सहभाग होता. तसंच मसाजोग गावातून नऊ पिकअपसह, सहा चार चाकी वाहन घेऊन अंतरवाली सराटीकडे निघाल्याचं धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Manoj Jarange: जालना पोलिसांची मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी 40 अटी

मुंबई आंदोलनासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांना जालना पोलिसांची अटी शर्तींसह  परवानगी दिली आहे. जालना पोलिसांकडून मनोज जरांगे यांना परवानगीसह  40 अटींचे पत्र पाठवण्यात आले आहे.  मुंबईतील आंदोलनावर ठाम  असलेल्या मनोज जरांगे यांना काल जालना पोलिसांनी कोर्टाच्या निर्णयाची प्रत दिली होती. मात्र, त्यानंतरही मनोज जरांगे यांनी आपण मुंबईला जाण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले होते.

जालना पोलिसांकडून मनोज जरांगेंना 40 अटी

1)सदर प्रवासामध्ये आक्षेपार्ह घोषणा तसेच जातीय तेढ निर्माण करणारी विधाने होणार नाही. याची दक्षता घ्यावी.

2)सदर प्रवासाचा मार्ग हा घोषीत केल्या प्रमाणेच राहील व नंतर बदलणार नाही याची दक्षता घ्यावी.

3) सदर प्रवासादरम्यान अत्यावश्यक सेवा पुरविणारे वाहन े जसे अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड इत्यादी तसेच इतर व वाहतुक / रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

4)सदर प्रवासा दरम्यान खाजगी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई करण्याची जबाबदारी आयोजक आणि आंदोलनकर्ते यांची राहील याची नोंद घ्यावी.

5)सदर प्रवासामध्ये सहभागी होणारे नागरिक हे आपल्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचे घातक शस्त्र, लाठी, काठी, तलवार, लोखंडी गज, दगड किंवा ज्वलनशील पदार्थ बाळगणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

यासह प्रमुख 40 अटी

आणखी वाचा

Manoj Jarange Maratha Morcha LIVE: मनोज जरांगे थोड्याचवेळात अंतरवाली सराटीहून मुंबईकडे कूच करणार, मराठा बांधव सज्ज