मुंबई : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या ट्वीटचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत बीकॉम पहिल्या वर्षाची उद्या (4 मे 2019) ची परीक्षा रद्द झाल्याचं ट्वीट विनोद तावडे यांच्या अकाऊंटवरुन केल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र फोटोशॉपच्या माध्यामातून हा खोटा मेसेज तयार करण्यात आल्याचं आता स्पष्ट झालं आहे.


या व्हायरल मेसेजची माहिती मिळताच विनोद तावडे यांनी स्वत: ट्वीट करत व्हायरल मेसेज चुकीचा असल्याचं सांगितलं. तसेच विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही तावडे यांनी केलं. बीकॉम पहिल्या वर्षाची परीक्षा वेळापत्रकानुसार होणार असून विद्यार्थ्यांनी हजर रहावे, असं सांगून विनोद तावडेंनी विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.


विनोद तावडे यांच्या ट्वीटची इमेज फोटोशॉप करुन त्याद्वारे उद्या होणारी मुंबई विद्यापीठाची बीकॉमची पहिल्या वर्षाची परीक्षा रद्द झाल्याचा एक चुकीचा मेसेज पाठविला जात आहे. त्यानुसार आपणास कळविण्यात येते की, उद्या होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा दिलेल्या वेळेवर होणार आहेत. कोणतीही परीक्षा रद्द झालेली नाही, असं परिपत्रक मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क उपकुलसचिव विनोद माळाळे यांनी काढलं आहे.