मुंबई : गोरेगावमधील जुन्या मराठी शाळांमधील विद्यावर्धिनी विद्यामंदिर मराठी शाळा अचानक बंद करण्यात येत असल्याचं संस्थाचालकांनी पालकांना सांगितलं आहे. त्यामुळे शाळेतील जवळपास 350 विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे. शाळेची इमारत धोकादायक झाल्याचं सांंगून संस्थाचालकांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
शाळा सुरु ठेवण्याचे सर्व पर्याय अवलंबून पाहिले मात्र ते यशस्वी न झाल्याने अखेर शाळा बंद करणार असल्याचं संस्थाचालकांनी पालकांना सांगितलं. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना इतर शाळेत प्रवेश द्यावा, असा सल्लाही संस्थाचालकांकडून देण्यात येत आहे.
26 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर पालक दुसऱ्या शाळेत प्रवेशासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र गोरेगाव, जोगेश्वरीमधील इतर तीन मराठी शाळा क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊ शकत नाही, असं कारण देत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असल्याचा पालकांचे म्हणणं आहे.
मराठी शाळा वाचविण्यात यावी यासाठी पालक आग्रही आहेत. त्यासाठी स्थानिक आमदार-खासदार यांच्यासोबत बैठकीचं नियोजन पालकांनी केलं होते. मात्र संस्थाचालकांनी उपस्थित राहण्यास नकार दिल्याने नियोजित बैठक होऊच शकली नाही. त्यामुळे पालकांनी शाळा वाचविण्यासाठी संस्थाचालक आग्रही नसल्याचा आरोप केला आहे.
दुसरीकडे संस्थाचालकांनी आपण शाळा बंद न करता सुरु ठेवण्याचे सर्व प्रयत्न केले. मात्र इमारत धोकादायक असल्याने या इमारतीची डागडुजी करावी लागणार आहे. यासाठी आम्ही इतरत्र शाळा काही दिवसासाठी हलविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र ते शक्य न झाल्याने आता या शाळेतील विद्यार्थ्यांना आम्ही इतर शाळांत प्रवेश घेण्यास सांगितल्याचे संस्थाचालकांचं म्हणण आहे.
विद्यार्थ्यांना इतर शाळेत प्रवेशासाठी अडचण येत असल्यास आम्ही मदत करत असल्याचंही संस्थाचालकांनी सांगितलं. संस्थाचालक शाळेची जागा बिल्डरला विकणार असल्याचा आरोप पालक करत आहेत. मात्र संस्थाचालक याबाबत बोलायला तयार नाहीत. संस्थाचालकांच्या या भूमिकेमुळे 350 मुलांचे भविष्य अंधारात असल्याचं पालकांनी सांगितलं.