मुंबई : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी बीफ फेस्टिव्हल आणि किस फेस्टिव्हलवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “तुम्हाला बीफ खायचंय तर जरुर खा, त्यासाठी फेस्टिव्हल कशाला,” असा परखड सवाल उपराष्ट्रपतींनी विचारला आहे.

मुंबईच्या पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याशिवाय, अशा फेस्टिव्हलपासून दूर राहण्याचा सल्लाही उपराष्ट्रपतींनी यावेळी दिला.


उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले की, “तुम्हाला बीफ खायचं असेल, तर जरुर खा! पण त्यासाठी बीफ फेस्टिव्हलचं आयोजन कशाला? त्याच प्रमाणे जर तुम्हाला एखाद्याला किस करायचं असेल, तो त्यासाठी देखील फेस्टिव्हल किंवा कुणाच्या परवानगीची आवश्यकता कशासाठी लागते?”

याशिवाय, अफजल गुरुचा गुणगान गाणाऱ्यांनाही उपराष्ट्रपतींनी यावेळी खडेबोल सुनावले. “काहीजण अफजल गुरुच्या नावाचा जप करतात. हे कशासाठी. खरं तर त्याने आपल्या संसदेवर दहशतवादी हल्ला घडवून आणला होता.”

दरम्यान, 17 फेब्रुवारी रोजी तिरुवनंतपुरमच्या चिथिरा थिरुनाल मेमोरियलमध्ये बोलताना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी धर्म आणि राजकारण याची एकमेकाशी संगड घालण्यापासून वाचण्याचं आवाहन केलं होतं. “राजकारणाला धर्माशी, आणि धर्माला राजकारणाशी जोडणं अतिशय चुकीचं आहे. जर आपण ‘वसुधैव कुटुंबकम्’वर विश्वास ठेवतो. तर धर्म किंवा जातीच्या आधारावर भेदभाव कशासाठी?” असं रोखठोक मत त्यांनी यावेळी मांडलं होतं.