मुंबई : शिवस्मारक आणि डॉ. आंबेडकर स्मारकाची घोषणा होऊन दोन वर्षे लोटली, मात्र अद्याप कामही सुरु झाले नाही. भाजपचं मुख्यालय मात्र दीड वर्षात बांधलं गेलं, अशी टीका करत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करत भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.


संजय निरुपम नेमकं काय म्हणाले?

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं भूमीपूजन होऊन दोन वर्षे लोटली, अद्याप स्मारकाच्या उभारणीसाठी एक वीटही रचली गेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनालाही दोन वर्षे झाली, तिथेही अद्याप काम सुरु झाले नाही. मात्र दिल्लीत अवघ्या दीड वर्षात भाजपच्या अलिशान मुख्यालयाची इमारत उभी राहिली. काल उद्घाटनही झाले. यांचं प्राधान्यक्रम कशाला आहे ते लक्षात येईल.”, अशा शब्दात संजय निरुपम यांनी भाजपवर निशाणा साधला.

विखे पाटलांचाही निशाणा

“आज शिवजयंती असल्यानं काल पंतप्रधानांनी शिवस्मारकासंदर्भात केलेलं वक्तव्य, मात्र यावेळी आंबेडकर स्मारक कधी होईल, याचा उल्लेख त्यांनी टाळला आहे. केवळ राजकीय सोयीसाठी महापुरुषांच्या नावाचा भाजपाकडून वापर सुरु असून आपल्या जाहिरातीसाठी छत्रपतींचे होर्डिंग उतरवण्याचं काम सरकारने केले. आगामी निवडणुकीत जनता यांना सत्तेतून खाली उतरवेल.”, असा इशारा यावेळी विखे पाटील यांनी दिला.

अवघ्या 16 महिन्यात भाजपचं मुख्यालय तयार

भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या मुख्यालयाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन काल (18 फेब्रुवारी) पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. अवघ्या 16 महिन्यांत या पाच मजली अत्याधुनिक इमारतीचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. ऑगस्ट 2016 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन झालं होतं. अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त अशा या पाच मजली इमारतीत एकूण 70 खोल्या असणार आहेत. एकाचवेळी 400 वाहनांच्या पार्किंगची सोय असेल.

संजय निरुपम यांनी केलेल्या टीकेला अद्याप भाजपच्या गोटातून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजप निरुपम यांना नेमकं काय उत्तर देतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.