Vasai Virar Municipal Corporation : वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील नागरिकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. घरपट्टी न भरल्यामुळे दंड झालेल्या नागरिकांसाठी महानगरपालिकेने अभय योजना (Abhay Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कर भरणा न केल्यामुळे दंड झालेल्या लोकांनी पालिकेने दिलेल्या वेळेत करभरणा केला तर त्यांना दंडाच्या रकमेत 50 टक्के सूट मिळणार आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

  


वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी या आगोदर घरपट्टी भरली नसेल आणि त्यामुळे पालिकेने त्यांना दंड लावला असेल तर आता अशा नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पालिकेने अशा नागरिकांसाठी 6 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत अभय योजना लागू केली आहे. या कालावधीत करभरणा केलेल्या अधिकृत आणि अनधिकृत मालमत्ताधारकांना 50 टक्के दंडात्मक रक्कमेत सूट देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी या अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केलं आहे. 


वसई -विरार शहर महानगरपालिकेने ( Vasai Virar Municipal Corporation ) मालमत्ता कर संकलनासाठी मागील वर्षभरात अनेक योजना राबवल्या होत्या. त्यामुळे सध्यस्थितीला जानेवारीच्या अखेरीपर्यंत घरपट्टी  कराची 300 कोटी रुपयांची विक्रमी करवसुली झाली आहे. पालिकेने यंदा मार्च अखेरपर्यंत 450 ते 500 कोटी रूपयांच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पालिकेने नागरिकांसाठी अभय योजना लागू केली आहे.


अभय योजना वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील अधिकृत तसेच अनधिकृत मालमत्ताधारकांसाठी लागू राहणार आहेत. ज्या मालमत्ता धारकांना घरपट्टी न भरल्याने दंड लागला असेल. अशांना आता त्यांच्या दंडात्मक रक्कमेत 50 टक्के पर्यंत सूट देण्यात येणार आहे. नागरिकांना आपला मालमत्ता कर ऑनलाईन देखील भरता येणार आहे. मालमत्ता कर ऑनलाईल पद्धतीने भरण्यासाठी पालिकेने www.vcmc.in  या वेबसाईटवर विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांनी लवकरात लवकर करभरणा करावा, असं आवहान पालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केले आहे.


दरम्यान, पालिकेच्या या निर्णयामुळे दंड झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. शिवाय अभय योजनेमुळे दंड झालेले जास्तीत जास्त नागरिक दंडात सूट मिळाल्यामुळे करभरणा करतील अशी अपेक्षा पालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी देखील पालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 


महत्वाच्या बातम्या


PNB Scam Case: PNB बँक घोटाळ्यातील एकमेव महिला आरोपीला पाच वर्षांनी जामीन मंजूर, कविता माणकीकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा