Merry Christmas 2021 : वसईत मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या नाताळ सणासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्याने वसईतील बाजार फुलून निघाला आहे. कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्यानंतर हा पहिलाच नाताळ असल्याने नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. पण यावर्षी या साहित्यांना महागाईच्या झळा देखील सोसाव्या लागत आहेत. सर्वच साहित्यांच्या किंमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


मागील दोन वर्षांपासून कोरोना या जागतिक महामारीने सर्व सणांसह नाताळ सणावरही विरजण पडलं होतं. यंदाच्या वर्षी कोरोना प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने आणि शासनाने निर्बंध शिथिल केल्याने या सणाच्या तयारीसाठी वसईत सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे. तब्बल दोन वर्षांनी नाताळ सण साजरा करता येणार असल्याने, नागरिकांना मोठा आनंद झाला आहे. वसईमध्ये नाताळची धामधूम सुरु झाली आहे. वसईचा पश्चिम पट्ट्यात प्रत्येक घरात येशूच्या जन्माची लगबग पाहायला मिळत आहे. नाताळ सण जवळ येत असल्याने बाजारपेठांना वेगळाच रंग चढला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदार विविध प्रयत्न करत आहेत. अनेक ठिकाणी वेगेवेगळ्या सवलती आणि आकर्षक सजावटीने दुकाने सजत आहेत. पण कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी सर्व साहित्यांच्या किंमतीत 25 ते 30 टक्क्यांची वाढ झालेली आहे.


आकर्षक भेटवस्तूंनी बाजार फुलला


यावर्षी वसईच्या बाजारात विविध प्रकारची सजावट पाहायला मिळत आहे. ख्रिसमस ट्री, स्टारबेल, कपडे, टोप्या, वेगवेगळे स्टॅच्यू, गव्हाणी, येशूचे पोस्टर्स, हॅंगिंग बेल, रंगीबेरंगी बॉल, कागदी तसेच मेटल स्टार, आकर्षक लाईटींग, फुगे, कंदील इत्यादी साहित्य बाजारात उपलब्ध आहे. ख्रिसमसनिमित्त बाजारात गिफ्टचे दालन खुले झाले आहे. खास भेट देण्यासाठी ख्रिसमस ट्रीसह विविध गोष्टी ग्राहक घेत आहेत.  


हे ही वाचा



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha