वसई : लग्न म्हटलं की धामधूम, पै-पाहुण्यांना आहेर, वरात असा सगळा तामझाम. आयुष्यात लग्न फक्त एकदाच होतं, असं म्हणत लग्नसोहळ्यांवर खर्च करणारे लोकही आजूबाजूला पाहायला मिळत असतील. मात्र वसईतल्या एका पित्याने मुलीच्या लग्नात आलेल्या आहेरात आणखी भर टाकत सगळा पैसा रुग्णालयाला दान केला.


वसईतील वाघोली गावातील पीटर फर्नांडिस यांच्या तानिया या मुलीचा विवाह माणिकपूर इथल्या मार्क डाबरेसोबत रविवारी (7 फेब्रुवारी) आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत पार पडला. तानियाच्या लग्नात आलेल्या आहेराची पाकिटे फोडली असता तब्बल पाच लाख रुपये जमा झाले होते. त्यात आणखी सहा लाखांची भर टाकत अकरा लाखांचा धनादेश वसईतील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयाला मदतीसाठी दिला.


पीटर फर्नांडिस यांचे वडील शिक्षक, भाऊ फादर असल्यामुळे त्यांचं कुटुंब नेहमी सामाजिक कार्यात पुढे राहतं. कोरोनाची लागण झाल्याने पीटर यांना 20 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. त्यावेळी रुग्णालयामध्ये अनेक रोगाने ग्रासलेले गरीब, वंचित येत असतात. हॉस्पिटलला मदत केल्यास अशा लोकांच्या उपचारांसाठी मदत होईल, या हेतूने मुलीच्या लग्नात आलेल्या पाच लाख आहेर तसेच आपल्याकडील आणखीन सहा लाखाची भर टाकत अकरा लाखाचा धनादेश वसईतील कार्डिनल ग्रेशियस रुग्णालयाला दिला.


रुग्णालयात येणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी हॅास्पिटलला हा निधी वापरता येतील असा विश्वास पीटर फर्नांडिस यांनी व्यक्त केला.