मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही प्रकार समोर आलेत. तसं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीतून जे सत्य जनतेसमोर येईल त्यानंतर कारवाई केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.


काय आहे प्रकरण?
23 वर्षांची पूजा चव्हाण काहीच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील परळीमधून पुण्यात आली होती. स्पोकन इंग्लिशचे क्लास करण्यासाठी ती पुण्याला जात असल्याचं तिने नातेवाईकांना सांगितलं होतं. पण पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणाऱ्या पूजाला या काळात हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याची गरज भासली. त्यानंतर काही दिवस गेले आणि रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवलं. त्यानंतर पूजाने हे टोकाचं पाऊल का उचललं याची उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. पूजा आणि तिच्या मित्राचे राज्य सरकार मधील एका मंत्र्यासोबतचे सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली.


भाजप आक्रमक
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपकडून थेट संजय राठोड यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणाशी संजय राठोड यांचा संबंध असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपनं केली आहे. पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या नसून हत्याच असल्याचा खळबळजनक आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.


राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल
राष्ट्रीय महिला आयोगाकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. रेखा शर्मा यांनी याबाबतच्या योग्य कारवाईसाठी महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करावी. तसेच या चौकशीचा अहवाल सादर करावा, असे यात नमूद करण्यात आले आहे.


मंत्री संजय राठोड नॉट रिचेबल
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागला आहेत. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणात थेट हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान हे प्रकरण उघड झाल्यापासून मंत्री संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. ते नेमके कुठे गेलेत? याबाबत कुठलीही माहिती नाही. ते पुण्यातील आढावा बैठकीलाही गैरहजर होते. त्यानंतर पुणे, मुंबई येथे असल्याची शक्यता वर्तवली जातेय.