वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीत चार वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. डंपर, स्विफ्ट कार, बलेनो आणि फॉर्च्युनर कार एकमेकांवर आदळून झालेल्या अपघात महिलेचा जागीच मृत्यू झाला.


वसईच्या सातिवली ब्रिजवर हा संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चारही गाड्या ब्रिजची संरक्षण भिंत तोडून खाली पडल्या आहेत. गाड्यांचा चक्काचूर झाला असून अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी आहेत. जखमींना मिरारोड येथील आरबीट रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. जखमी किंवा मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. वालीव पोलिस आणि महामार्ग पोलिस अधिक तपास करत आहेत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.