CM Eknath Shinde : महाराष्ट्रातील राजकारणात 'वर्षा' बंगल्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान म्हणून 'वर्षा' बंगल्याची ओळख आहे. इतकंच नाही तर हाच 'वर्षा' बंगला (Varsha Bungalow) महाराष्ट्रातील राजकीय घटनांचा, घडामोडींचा साक्षीदार आहे. आता या 'वर्षा' बंगल्याला अखेर एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागली आहे. परंतु प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) 'वर्षा' बंगल्यावर राहायला जाणार का?


राज्यात सत्तांतर होऊन एक महिना उलटला. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी शपथ घेतली. प्रथा आणि नियमाप्रमाणे मुख्यमंत्र्यांचं वास्तव्य हे वर्षा बंगल्यावर असतं. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर महिना उलटला तरी एकनाथ शिंदे अद्यापही 'नंदनवन' बंगल्यावर वास्तव्यास आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर राहायला जाणार? 
खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2014 पासून मलबार इथल्या 'नंदनवन' या शासकीय निवासस्थानातून आपला कारभार चालवत आले आहेत. महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 जून रोजी 'वर्षा' निवासस्थान सोडलं होतं. तेव्हापासून हा बंगला रिकामाच होता. अखेर एक महिन्यानंतर वर्षा निवासस्थानाला एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावली गेली आहे. तसेच 'वर्षा' बंगल्याची रंगरंगोटी देखील पूर्ण झाली आहे. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे 'वर्षा' या निवासस्थानी राहायला जाणार का? आणि गेले तर कधी जाणार असा सवाल विचारला जात आहे.




वर्षा बंगल्याचा रंजक इतिहास
'वर्षा' बंगल्याचा इतिहास अतिशय रंजक आहे. 'वर्षा' या बंगल्याचे मूळ नाव 'डग बीगन' होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 'सह्याद्री' बंगला हे आपले अधिकृत निवासस्थान केले होते. चव्हाण यांच्यानंतरचे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी ही परंपरा कायम ठेवली. परंतु त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या कृषीमंत्री वसंतराव नाईक यांच्या वाट्याला 'डग बीगन' हा बंगला आला. कन्नमवार यांच्या निधनानंतर वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले. त्यांनी त्याच बंगल्यात राहायचा निर्णय घेतला आणि त्याचं नाव 'वर्षा' असं ठेवलं. तेव्हापासून वर्षा बंगला आणि मुख्यमंत्री असं नातं तयार झालं जे आजतागायत कायम आहे.


महाराष्ट्रातील राजकीय घटनांचा, घडामोडींचा साक्षीदार 'वर्षा' बंगला
अनेक मोठ्या राजकीय घडामोडी आणि त्यामधील विविध रहिवाशांमुळे 'वर्षा' बंगला कायम चर्चेत राहिला आहे. विशेष म्हणजे, आजवर फक्त दोन मुख्यमंत्रीच (वसंतराव नाईक आणि देवेंद्र फडणवीस) पूर्ण पाच वर्षे या बंगल्यात राहू शकले आहेत. त्याचप्रमाणे कोणतंही निर्वाचित पद कधीच न भूषवलेले उद्धव ठाकरे 'वर्षा'मध्ये प्रवेश करणारे अपवादात्मक मुख्यमंत्री ठरले. 'वर्षा' बंगल्याला महिला मुख्यमंत्री मात्र आजवर लाभलेली नाही. अशा 'वर्षा'चा इतिहास एकप्रकारे महाराष्ट्राची राजकीय कुंडलीच म्हणता येईल.


इतर महत्त्वाच्या बातम्या