Kalyan News Update: शौचालयास गेलेली महिला शौचालयाच्या भांड्यासह सेफ्टी टॅंक मध्ये (Safety Tank) पडल्याची धक्कादायक घटना कल्याण जवळ मोहणे (Kalyan News) येथे घडली. बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. हे शौचालय धोकादायक झाले होते याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा केडीएमसीकडे तक्रारी केल्या मात्र केडीएमसीने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 


या दुर्घटनेत महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या निमित्ताने पालिका क्षेत्रातील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था उघड झाली आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच महापालिकेने घटनास्थळी धाव घेत हे शौचालय वापरासाठी बंद केले तसेच या ठिकाणी पर्याय शौचालयाची व्यवस्था केली आहे.


वारंवार तक्रार करुन देखील महापालिकेकडून दुर्लक्ष


कल्याण पश्चिमेकडील मोहने परिसरातील लहूजीनगर येथे 20 वर्ष जुने महापालिकेचे सार्वजनिक शौचालय आहे. हे शौचालय धोकादायक झाले आहे. वारंवार तक्रार करुन देखील महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बुधवारी सकाळी या शौचालयात एक गर्भवती महिला शौचास गेली. याच दरम्यान महिला शौचाच्या भांड्यासह सेफ्टी टँकमध्ये पडली. महिलेने मदतीसाठी आरडाओरड केला.


दुर्घटनेत महिला जखमी,  उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल  


तिचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला बाहेर काढलं. मात्र या दुर्घटनेत महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून स्थानिक नागरिक या शौचालयाच्या दुरावस्थेबाबत महापालिकेकडे तक्रारी करत आहेत. मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. तर याबाबत महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी सदर शौचालय हे 20 वर्ष जून असून ते धोकादायक झाले होते. शौचालय एन आर सी कंपनीच्या जागेवर आहे. या घटनेनंतर सदर शौचालय वापरासाठी बंद करण्यात आले असून नागरिकांसाठी पर्यायी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे महापालिकेच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली  आहे.