मुंबई : कोरोना संकट ओढावण्याला साधारण वर्षभराचा काळ लोटला, तरीही हे संकट काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे, अशातच प्रशासकीय यंत्रणांकडून सातत्यानं नियमावली आणि निर्बंध घोषित केले जात आहेत. या निर्बंधाची आणि नियमांची अंमलबजावणी अगदी काटेकोरपणे केली जात आहे की नाही, यावरच पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. चोवीस तास अहोरात्र आपल्या कर्तव्यासाठी संकटाला पाठीवर मारणाऱ्या या यंत्रणेत काम करणाऱ्या कैक पोलीस कर्मचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो.
पोलिसांच्याही काही गरजा असतात, हीच बाब हेरत आता शहरातील वॅनिटी व्हॅन मालकांनी त्यांची ही वॅन मुंबई पोलिसांच्या सेवेत देण्याचा निर्णय घेतला आहे. संचारबंदीच्या नियमांमुळे मुंबईच्या अनेक रस्त्यांवर नाकाबंदीचे नियम लागू करण्यात आले आहेत. शिवाय ठिकठिकाणी बॅरिगेट्सही लावण्यात आले आहेत. निमांचं पालन करत नागरिकांनी मोठ्या संख्येनं बाहेर येऊ नये, यासाठीचेच हे प्रयत्न.
महामार्गांवरही हीच परिस्थिती. अशातच त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना .काही क्षणांची विश्रांती मिळावी यासाठी, सोबतच कपडे बदलणं आणि शौचालयाच्या सुविधेसाठी आतापर्यंत जवळपास 4 वॅनिटी व्हॅन पोलिसांच्या सेवेत देण्यात आल्या आहेत.
Oxygen Express : पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमसाठी आज रवाना, गाडीसाठी स्पेशल ग्रीन कॉरिडॉर!
आतापर्यंत दहिसर, दिंडोशी, मालाड आणि घाटकोपर या भागांमध्ये या व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत. वॅनिटी व्हॅन म्हटलं की अेक सेलिब्रिटींची नावं समोर येतात. पण, आता मात्र सेलिब्रिटींच्या आयुष्याचा भाग असणाऱ्या या आलिशान व्हॅन थेट मुंबई पोलिसांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत.
सहसा एका वॅनिटी व्हॅनमध्ये 3 खोल्या असतात. प्रत्येक खोलीला स्वतंत्र शौचालय जोडलेलं असतं, तर प्रत्येक वातानुकुलित खोलील आराम करण्यासाठीचीही सोय असते. व्हॅनिटी व्हॅनचे मालक केतन रावल यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात पूर्ण लॉकडाऊनची परिस्थिती ओढावली तरीही अशा अवस्थेतसुद्धा मुंबई पोलिसांसाठी 24 व्हॅनिटी तयार आहेत. या व्हॅन पोलिसांच्या आवश्यकतेनुसार त्यांना देण्यात येतील.