Vanchit Bahujan Aghadi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली आणि त्यानंतर राज्यात आता नवीन समीकरण तर समोर येणार नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे आपली भूमिका सांगितली आहे. प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की, जे भाजपसोबत आहेत त्यांच्यासोबत आम्ही जाण्याचा विषय येत नाही. यामुळं वंचितनं शिंदे गटासोबतच्या युतीवर पडदा टाकला असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच महाविकास आघाडीत सामावून घेण्यासाठी काही हालचाल होतेय का याकडे देखील लक्ष असल्याचं म्हटलं आहे काँग्रेसचे वरिष्ठ नेते भेटून गेले मात्र ठाकरे गटाकडून अद्याप राजकीय चर्चा नाही, असंही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मविआमधील काही घटकांची माझ्याशी चर्चा झाली. नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस एकटे लढणार आहे. त्यामुळं मविआ म्हणून एकत्र बोलणार आहात की वंचित बहुजन आघाडीशी प्रत्येक घटक वेगवेगळी चर्चा करणार आहात, हे त्यांनी स्पष्ट करावं. अजूनपर्यंत महाविकास आघाडीतील घटकांकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मुख्यमंत्री आणि प्रकाश आंबेडकरांची भेट
राज्याच्या राजकारणामध्ये आज एक महत्त्वाची घटना पाहायला मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थानी जाऊन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध समीकरण यांच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे 20 नोव्हेंबरला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत. या कार्यक्रमाचे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याचे चर्चांना सुरुवात झाली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे आता ही नव्या समीकरणांची नांदी तर नाही ना अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता आता महाविकास आघाडी राहणार की ठाकरे गट वंचित बहुजन आघाडी सोबत जाणार अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र वंचित बहुजन आघाडीला आपल्या बाजूने घेण्यासाठी तर आज मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली नाही ना? असा संशय या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. एकनाथ शिंदे यांनी मात्र मी केवळ सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. ठाकरे आणि वंचित कार्यक्रमाचा याच्याशी काही संबंध नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीतील सध्या तरी काँग्रेस स्वबळाची भाषा करत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेऊ असं म्हणलं आहे. त्यामुळे आता ठाकरे गट वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार की शिंदे गट वंचित बहुजन आघाडीला आपलंस करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे