मुंबई : कोरोना लसीचा मुंबईत उपलब्ध असलेला साठा आज जवळपास संपुष्टात आला आहे. या कारणाने उद्या 29 एप्रिलला मुंबईतील 73 पैकी 40 खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही. तर उर्वरित 33 खासगी लसीकरण केंद्रांवरही मर्यादित लससाठी उपलब्ध आहे. या कारणाने तेथे दुसऱ्या मात्रेसाठी (डोस) येणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने व लससाठा असेपर्यंतच लस देण्यात येणार आहे.
दरम्यान, आज रात्री उशिरापर्यंत काही प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा साठा प्राप्त झाल्यास उद्या मुंबईतील शासकीय तसेच महानगरपालिका रुग्णालयातील केंद्रांवर लसीकरण सुरु राहणार आहे. लस साठ्याच्या उपलब्धतेची ही वस्तुस्थिती पाहता उद्या दुसरी मात्रा घेण्यास पात्र असणाऱ्यांनीच लसीकरणासाठी यावे, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून करण्यात येत आहे. लससाठ्याचा ओघ वाढल्यानंतर लसीकरण मोहिम पूर्ववत सुरु होईल, अशी अपेक्षा आहे.
राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे 63 लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात 73 अशी एकूण 136 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. मात्र, कोविड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते. त्यातही दुसरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेऊन दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे.
Covid 19 Vaccination Free : महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबईतील लसीकरण मोहीम अखंडीतपणे सुरु ठेवता यावी, त्यासाठी आवश्यक लससाठा उपलब्ध व्हावा, याकरता बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. या अनुषंगाने, आज रात्री उशिरापर्यंत सरकारकडून काही प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आज रात्री उशिरापर्यंत लस साठा उपलब्ध झाला तर उद्या सकाळी लससाठा वितरण करण्यात येईल. त्यानंतर महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु करण्यास उशीर होऊ शकतो.
Corona Vaccine Registration : लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची?
महानगरपालिकेला 25 एप्रिलपर्यंत एकूण 24 लाख 58 हजार 600 इतक्या लसी उपलब्ध झाल्या. पैकी, 24 लाख 10 हजार 860 लस उपयोगात आल्या. म्हणजेच 47 हजार 740 इतका लससाठा आज दुपारी 2 वाजेपर्यंत लसीकरणानंतर संबधित केंद्रावर शिल्लक होता. लसीकरणाचा वेग लक्षात घेता हा लससाठा आजच पूर्णतः उपयोगात येण्याची शक्यता आहे.