मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा भाऊ अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील रोखठोक या सदरातील लेखावरुन नीरज सिंह संजय राऊतांवर मानहानीचा खटला दाखल करणार आहे. सुशांत सिंहच्या वडिलांचे दोन विवाह झाले होते, त्यामुळे सुशांत नाराज होता, असं संजय राऊत यांनी 'सामना'तील या लेखात म्हटलं होतं. मात्र सुशांतच्या कुटुंबीयांनी या आरोपांचं खंडन केलं होतं.


नीरज सिंह बबलू हा सुशांतचा चुलत भाऊ असून तो बिहारमध्ये भाजपचा आमदार आहे. के के सिंह आणि कुटुंबावरील वैयक्तिक आरोपांवरुन नीरज सिंह संजय राऊत यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार आहे. तसंच संजय राऊत यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणीही नीरज सिंह यांनी केली आहे.





रोखठोकमध्ये संजय राऊत काय म्हणाले?
सुशांतचे त्याच्या वडिलांशी संबंधित चांगले नव्हते. वडिलांनी केलेलं दुसरं लग्न सुशांतला मान्य नव्हतं. सुशांतच्या वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक एफआयआर दाखल करायला लावला गेला. म्हणून मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले.


कुटुंबीयांकडून आरोपांचं खंडन
दरम्यान, संजय राऊत यांचे आरोप सुशांत सिंहच्या कुटुंबीयांनी फेटाळले आहेत. संजय राऊत धादांत खोटं बोलत असल्याचं सुशांतचे मामा आर. सी. सिंह यांनी म्हटलं आहे. "सुशांतच्या वडिलांचं एकच लग्न झालं आहे, त्यानी दुसरं लग्न केलंच नाही. सर्व चुकीच्या गोष्टींना लपवण्यासाठी चुकीचे आरोप केले जात आहेत," असं ते म्हणाले.


दुसरीकडे या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा काडीमात्र संबंध नसून ते सुशांतला न्याय मिळवून देतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं. संजय राऊत म्हणाले की, "सुशांत प्रकरणात राजकारण होत आहे. बिहार निवडणुकीमुळेच हे राजकारण होत आहे. आदित्य ठाकरेंचा याच्याशी काही देणं-घेणं नाही. सुशांत मुंबईचा मुलगा आहे, त्याला न्याय देण्याची जबाबदारी आमची आहे."


SSR Suicide Case | हिम्मत असेल तर भाजपने आदित्य ठाकरे यांचं नाव घ्यावं : संजय राऊत