मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान हे सध्या वयोमानानुसार आजारी असून त्यांच्यावर 'पेसमेकर' प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी शासकीय रुग्णालयात सुविधा उपलब्ध आहे का? त्याबाबत माहिती देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत.

Continues below advertisement


पंजाब अँण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या 4 हजार 355 कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान आणि कंपनीचे प्रमोटर राकेश वाधवान यांच्यासह दलजीत सिंग पाल, गुरुंनाम सिंह होठी व इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश वाधवान कारागृहात असताना अचानक तब्येत खालावल्याने त्यांना आजारपणाच्या मुद्द्यावर पालिकेच्या केईएम रुग्णालयात एप्रिल महिन्यात दाखल करण्यात आलेलं आहे. मात्र आजारपणामुळे आपल्याला जामीन देण्यात यावा अथवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात यावं अशी मागणी करत वाधवान यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर नुकतीच न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. 


त्यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी युक्तिवाद करताना हायकोर्टाला सांगितलं की वैद्यकीय अहवालांनुसार, वाधवन हे सध्या अनेक आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांना हृदयाचा 'टची-ब्रॅडी सिंड्रोम' आजार आहे. त्यासाठी त्यांना ड्युअल चेंबर पेसमेकर लावण्यासाठी त्यांची अँजिओप्लास्टी करण्याची गरज आहे. यावर उत्तर देताना सरकारच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले की, पेसमेकर प्रत्यारोपणाची सुविधा केईएम रुग्णालयात नाही. पण इतर कोणत्या सरकारी रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध आहे की नाही त्याबाबत माहिती घेऊन सांगू. न्यायालयानं हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी तूर्तास तहकूब केली.